केंद्रीय लाभासाठी मुख्यमंत्र्यांचा धडाका
विविध प्रकल्पांना मिळविली मंजूरी: बुधवारी भेटले दोघा केंद्रीय मंत्र्यांना : निवडणुकीपूर्वी विकासकामांचा सपाटा
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौऱ्यात काल बुधवारी केंद्रीय गृहनिर्माण, शहरी व्यवहार आणि वीजमंत्री मनोहरलाल खट्टर तसेच केंद्रीय कोळसा व खाणमंत्री किशन रेड्डी गंगापुरम या दोघांची भेट घेतली. त्यांनी गोवा राज्याशी संबंधित विविध विकासप्रकल्पांबाबत चर्चा केली. त्यामुळे राज्यातील शहरी भागातील विकासकामे-प्रस्ताव व खाण उद्योगास गती व आर्थिक आधार मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून तोपर्यंत जमेल तेवढा विकास साधण्याचा आणि केंद्राची मदत मिळवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री डॉ. सावंत करीत असल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली भेटी त्यांनी वाढविल्या असून विविध केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडून गोव्यातील विकासकामे पूर्ण करून घेण्यावर भर दिल्याचे समोर येत आहे. केंद्र सरकारशी संबंधित गोव्यातील विविध विकासकामे, प्रकल्प यांचा आढावा घेऊन त्यांना गती देण्याचा प्रयत्न डॉ. सावंत यांनी केला आहे. गोवा राज्यातील खाण उद्योग पुढे नेण्यासाठी त्यांनी रेड्डी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल बुधवारी खट्टर यांच्या भेटीत ‘अर्बन चॅलेंज फंड’ या निधीतून साकार करण्यासाठी गोवा सरकारने दिलेल्या विविध विकासकामांच्या प्रस्तावांना मान्यता देण्याची मागणी डॉ. सावंत यांनी केली आहे. गोव्यातील गृहनिर्माण, शहरी विकास तसेच इतर साधनसुविधा वाढवण्यावर चर्चा झाली.
गोवा वीज क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा आढावा त्यांच्या बैठकीतून घेण्यात आला. ते प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत यासाठी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी खट्टर यांच्याकडे केली. ‘अर्बन फंड’ या निधीतून गोव्यातील रस्ते, इतर सोयीसुविधांची सुधारणा आणि जनतेला चांगली सेवा मिळावी म्हणून अनेक प्रकल्प राबवण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न असल्याचे डॉ. सावंत यांनी खट्टर यांना सांगितले. राज्यातील नगरपालिका कक्षेत अनेक कामे प्रलंबित असून ती पूर्ण व्हावीत म्हणून या निधीचा वापर करण्याचा सरकारचा इरादा आहे. शहरीकरण वाढत असून त्यानुसार सुविधा वाढवणे अत्यावश्यक झाले आहे. डॉ. सावंत व खट्टर यांच्या चर्चेतून विकास प्रकल्प कामांसाठी आर्थिक बळ मिळण्याची शक्यता डॉ. सावंत यांनी वर्तवली आहे.
डिजिटल सुविधांचा विकास शक्य
‘अर्बन फंड’ हा केंद्र सरकारचा शहरी विकासासाठी सुरू केलेला निधी असून त्याचा जास्तीत जास्त लाभ गोव्यासाठी व्हावा म्हणून डॉ. सावंत यांनी खट्टर यांच्या भेटीत प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जुन्या शहरांचा पुनर्विकास करण्यावर तसेच स्वच्छतेवर भर देण्यात आला असून गोव्यातील शहरात भूमीगत केबल प्रकल्प, डिजिटल पायाभूत सुविधा यांचा लाभ पणजीसह फोंडा, मडगाव, वास्को, म्हापसा या शहरांना व्हावा यासाठी केंद्राकडे अतिरिक्त निधी मागण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कचरा व्यवस्थापनासाठी हवाय निधी
शहरांमध्ये कचऱ्याची उचल आणि विल्हेवाट हा मोठा गंभीर प्रश्न असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक असल्याचे खट्टर यांना सांगण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.