For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्र्यांची सोमवारी शेतकऱ्यांसोबत बैठक

11:39 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्र्यांची सोमवारी शेतकऱ्यांसोबत बैठक
Advertisement

सुवर्णविधानसौधमध्ये आयोजन :15 जिल्ह्यांतील शेतकरी प्रतिनिधींसह लोकप्रतिनिधींचा सहभाग

Advertisement

बेळगाव : उसाला योग्य दर, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू करणे, स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर आता या प्रश्नांवर चर्चेची प्रक्रिया सुरू झाली आहे. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवार दि. 26 रोजी सुवर्णविधानसौधमध्ये महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक घेऊन सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीसाठी राज्यातील 15 जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आणि विधानपरिषद सदस्य, निगम-महामंडळांचे अध्यक्ष, कारखानदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बैठकीचे नियोजन करताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे. प्रत्येक विभागाने आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बैठकीसाठी उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. व्यासपीठावर मंत्र्यांच्या बैठकीसाठी योग्य नियोजन करावे. तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांचीही भोजनाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बैठकीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पुरेशा व मूलभूत सुविधांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Advertisement

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कक्षाची स्वच्छता करून सुस्थितीत ठेवावेत. सुवर्णविधानसौध परिसरातील स्वच्छता, बैठक व्यवस्था व इतर मूलभूत सुविधांची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. बैठकीसाठी येणाऱ्या मान्यवरांना, तसेच शेतकरी प्रतिनिधींना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीचे सुवर्णविधानसौध परिसरात थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने आवश्यक तांत्रिक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. ध्वनिक्षेपण व्यवस्था, इंटरनेट कनेक्टिव्हिटी व प्रक्षेपणासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करण्यासह तपासणी करून घ्यावी. बैठकीदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

बैठकीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहण्याची शक्मयता लक्षात घेऊन सुवर्णविधानसौध परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा. शेतकरी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि इतर उपस्थितांना बैठकीच्या ठिकाणी ये-जा करताना अडचण होणार नाही, यासाठी नियोजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधींची नावे निश्चित करून यादी द्या

या बैठकीत 15 जिल्ह्यांतून प्रत्येकी पाच शेतकरी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींची नावे निश्चित करून त्यांची यादी वेळेत सादर करावी. सहभागी शेतकऱ्यांची संख्या, त्यांची उपस्थिती व आवश्यक सुविधांचे नियोजन आधीच पूर्ण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

Advertisement
Tags :

.