मुख्यमंत्र्यांचे आपत्ती व्यवस्थापन ठरले मोठे अपयश : काँग्रेस
पणजी : मंगळवारी, बुधवारी झालेल्या पावसामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. शेकडो कोटी ऊपये खर्च करून आणि कथित ‘हाय लेवल-एसी बैठका’ घेऊनही पावसाच्या काही तासांतच गोव्याची भयानक परिस्थिती समोर आली आहे, अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. पणजी शहरापासून अन्य शहरे तसेच अनेक गावांपर्यंत झालेली पूरस्थिती ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, ती सरकार निर्मित आपत्ती आहे. भाजप सरकार पूर्णपणे अकार्यक्षम, बेजबाबदार, असंवेदनशील आणि भ्रष्ट असून मूलभूत सेवा देण्यातही सतत अपयशी ठरले आहे, असे पणजीकर यांनी म्हटले आहे. नालेसफाई, आपत्ती पूर्वतयारी आणि पूर प्रतिबंधक योजनेचे फक्त दिखावेखोर कार्यक्रम झाले. वस्तुस्थिती मात्र भयानक होती आणि अजूनही आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलेले, गटारे तुंबलेली, नागरिक अडकलेले, मालमत्तेचे नुकसान आणि प्रशासनाचा पूर्ण अनुपस्थितपणा, असे वास्तव चित्र आहे, असेही पणजीकर म्हणाले.
खर्च केलेल्या कोटी गेल्या कुठे?
भाजप सरकारने स्मार्ट सिटी, चक्रीवादळ प्रतिबंधक उपाययोजना, आणि एकंदरीत पावसाळी तयारीच्या नावाखाली कोटींचा खर्च केल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात ते पैसे गेले कुठे? ‘मिशन टोटल कमिशन’ आणि प्रसिद्धीसाठी हे निधी वळवले गेले काय? असा प्रश्नही पणजीकर यांनी केला आहे.
काँग्रेसच्या चार मागण्या
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने पुढील चा मागण्या केल्या आहेत. 1. मागील पाच वर्षांत आपत्ती व्यवस्थापन व नालेसफाईसाठी खर्च झालेल्या निधीवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. 2. सर्व सार्वजनिक कामे आणि पूर प्रतिबंध प्रकल्पांचे स्वतंत्र, तज्ञ संस्थांमार्फत लेखापरीक्षण करावे. 3. पूरग्रस्त कुटुंब, व्यापारी आणि नागरिकांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. 4. सतर्कतेच्या इशाऱ्यानंतरही उपाययोजना न करणाऱ्या मंत्री व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जावी.
गोव्याला काम करणारे सरकार हवे आहे, केवळ देखावे करणारे नको. भाजप सरकार प्रत्येक पातळीवर अपयशी ठरले आहे आणि त्याची किंमत गोमंतकीय जनतेला मोजावी लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वातानुकूलित कार्यालयातून बाहेर येऊन, गोव्याच्या पाण्यात बुडालेल्या रस्त्यांवर चालत जावे आणि त्यांच्या सरकारने निर्माण केलेली आपत्ती स्वत: पाहावी. काँग्रेस पक्ष गोमंतकीय जनतेसोबत ठामपणे उभा आहे आणि भाजपच्या अपयशांचा पर्दाफाश करत राहील, असेही पणजीकर यांनी सांगितले.