राज्यात मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिक्त नाही
वनमंत्री ईश्वर खंड्रे : यतिंद्र यांच्या वक्तव्यावर काहीही बोलण्याची गरज नाही, नोव्हेंबरमध्ये राजकीय क्रांती हा पूर्णपणे भ्रम
बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसह प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदही रिक्त नाही. यावर चर्चा अप्रासंगिक असल्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी स्पष्ट केले. आमदार यतिंद्र सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, विधानपरिषद सदस्य यतिंद्र यांचे शब्द मुख्यमंत्र्यांचा आवाज म्हणून दाखवणे योग्य नाही. यतिंद्र यांनी यापूर्वीच स्वत: त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले असून आपणाला त्यावर काहीही बोलण्याची गरज नसल्याचे मंत्री खंड्रे यांनी सांगितले.
नेतृत्त्वाचा निर्णय कोणत्याही जाती, पंथ किंवा धर्माच्या आधारावर घेतला जात नाही. 2028 मध्येही पक्ष पुन्हा सत्तेत येणार असून त्यानंतर पक्षाचे नेते योग्यवेळी सर्व जाती आणि समुदायांची मते घेऊन निर्णय घेतील. नोव्हेंबरमध्ये राजकीय क्रांती हा एक पूर्ण भ्रम आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार सुशासन देत आहे. राज्यातील लोकांनीही त्यांचे कौतुक केल्यामुळे विरोधी पक्ष घाबरले आहेत, असेही मंत्री ईश्वर खंड्रे यांनी स्पष्ट केले.
हत्ती छावणीतील हत्तींबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, तेथे चार हत्तींच्या दुखापतींची माहिती मिळताच चौकशीचे आदेश दिले आहे. तज्ञ डॉक्टरांकडून हत्तींवर उपचार करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. राज्यात वन्यजीव पशुवैद्यकांची कमतरता असून त्यांची नियुक्ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना पशुवैद्यकीय विभागाकडून कर्ज सेवा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून मी समाधानी
मुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्यांनी मला वन, पर्यावरण आणि जीवशास्त्र विभागाची जबाबदारी दिली आहे. मी पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी काम करत आहे. याबद्दल मी समाधानी आहे, असेही ईश्वर खंडे यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले.
वनमंत्री दिल्ली दौऱ्यावर
गुरुवारी वनमंत्री ईश्वर खंड्रे दिल्लीला गेले असून शुक्रवारी पक्षाच्या काही नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण बैठक होणार आहे. याशिवाय एच. एम. टी. कंपनीच्या ताब्यातील वनजमीन आणि वन विकास शुल्काशी संबंधित काही प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत ते वरिष्ठ वकिलांशी सल्लामसलत करतील. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री दौऱ्यावर असल्याने खंड्रे सरकारी सचिवांना भेटणार आहेत. दरम्यान, कंपा निधी, एत्तीनहोळे प्रकल्प इत्यादींसह विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.