निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री 22 हजार पदे भरतील
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना खात्री : तरुणांना नोकरी भाजपच देऊ शकतो : पुढील सरकारही भाजपचेच
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे जादूगार असून विविध सरकारी खात्यांमधील रिकामी असलेली 22 हजार पदे ते विधानसभा निवडणुकीपूर्वी भरतील, अशी खात्री आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केली आहे. मिरामार येथे गास्पर द डायस सभागृहात झालेल्या चौथ्या वार्षिक नर्सिंग परिषदेनंतर राणे हे पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी वरीलप्रमाणे खात्री व्यक्त करुन सांगितले की, राज्यातील सर्व मतदारसंघांत असलेल्या बेकार तरुण - तरुणींना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे. त्यासाठी ते धडपडत असून अर्ज करीत आहेत. गोव्यात सरकारी नोकऱ्यांची सर्वांनाच विशेष आवड आहे. त्यांना नोकरी देण्याचे काम फक्त भाजपच करु शकतो, तशी भाजपची क्षमता आहे, असेही राणे यांनी नमूद केले.
पुढील सरकारही भाजपचेच
ते पुढे म्हणाले की, आम्ही एकाच मतदारसंघासाठी कामे करीत नाही तर संपूर्ण गोवा राज्याकरीता कामे करतो. बहुतेक सर्व मतदारसंघांत फिरतो. तेव्हा त्यांच्या नोकरीच्या मागण्या आपल्यापर्यंत पोहोचतात. मुख्यमंत्र्यांना देखील एकंदरित परिस्थितीची कल्पना आहे. त्यांना बेकारांची काळजी आहे म्हणून निवडणुकीपूर्वी ते सर्व पदे भरतील, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. तशी भरती झाल्यास बेकार युवक समाधानी होणार आहेत. आमच्या या सरकारच्या विविध कामांमुळे पुढील सरकारही भाजपचेच असणार यात शंका नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 500 नर्स पदे
तत्पूर्वी राणे यांनी नर्सिंग परिषदेचे उद्घाटन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आता राज्यात लवकरच नर्सरी कॅन्सर हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असून तेथे सुमारे 500 नर्सच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. नर्सचे प्रशिक्षण घेतलेल्यांना तेथे संधी मिळणार आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात खूप प्रगती व विकास झाला असून सर्व सरकारी इस्पितळात तसेच आरोग्य केंद्रातून प्रशिक्षित नर्स, चांगले डॉक्टर्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात आधुनिक उपकरणांचा समावेश आहे. नर्सकडून रुग्णांच्या खूप अपेक्षा असतात. त्या नर्सनी पूर्ण कराव्यात. त्यांनी प्रेमाने रुग्णांची सेवा करावी. नर्सना खूप प्रकारचे काम असते व ते करावे लागते. ते सहसा रुग्णांना माहीत नसते म्हणून त्यांनी सहसा आपल्या सेवेत खंड पडू देऊ नये, असे मार्गदर्शन राणे यांनी केले.