केरळ दैऱ्यात मुख्यमंत्र्यांची धर्मादाय संस्थांना भेटी
महान कोकणी वैद्यत्रयींना वाहिली श्रद्धांजली : वृद्धाश्रमातील महिलांशी साधला संवाद
पणजी : केरळ भेटीवर गेलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी तेथील विविध स्थळे, देवस्थाने, मान्यवर व्यक्ती यांच्या भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा मासिक कार्यक्रमही पाहिला व नंतर उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्र्यांनी कोची येथील भेटीत ‘हॉर्टस मालाबारिकस’ या वनस्पतीविषयक ग्रंथाचे 17 व्या शतकात लेखन करणारे अप्पू भट, विनायक पंडित आणि रंगा भट या कोकणी वैद्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना त्यांनी, या तिन्ही वैद्यांनी 700 पेक्षा जास्त औषधी प्रजातींचे रेखाचित्रे या ग्रंथाच्या माध्यमातून संकलित केली आहेत. तसेच कोकणी, देवनागरी लिपी आणि मल्याळम भाषेच्या पहिल्या ब्लॉक प्रिंटिंगचे श्रेय या ग्रंथाला जाते, असे नमूद केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोची येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, पद्मश्री नारायण पुरुषोत्तम मल्ल्या यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ‘कोंकणी पितामह’ या पदवीने सन्मानित श्री. मल्ल्या यांनी कोकणीतून अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याचबरोबर कोकणीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी चळवळ सुरू करण्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले व कोकणी भाषेचे समर्पित समर्थक म्हणून त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.
श्रीतिरुमला देवस्वोम संस्थानला भेट
केरळमधील कोची येथील महाक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्रीतिरुमला देवस्वोम गोशीपुरम, संस्थानला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली. केरळमधील जीएसबी समुदायाचे सर्वात मोठे सामाजिक-धार्मिक संस्थान असून त्याचे महान सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व ओळखून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अनुग्रह चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचा गौरव
एर्नाकुलम येथील भेटीत मुख्यमंत्र्यांनी अनुग्रह चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने केरळमधील कोकणी समुदायाने आयोजित केलेल्या भव्य स्वागत समारंभाला उपस्थिती दर्शवून सहकारी कोकणी भाषिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. कोकणी भाषा, संस्कृती आणि राज्यातील भाषेतील साहित्य निर्मितीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याच ट्रस्टतर्फे संचालित महिलांसाठीच्या ‘नर्मदा अनुग्रह’ या मोफत गृहाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी तेथील रहिवासी, समर्पित कर्मचारी आणि या उदात्त कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधला. या ट्रस्टच्या ‘मानव सेवा, माधव सेवा’ या त्यांच्या प्रेरणादायी ब्रीदवाक्याद्वारे मार्गदर्शन करत समाजसेवेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले.
‘मन की बात’ हा प्रेरणेचा स्रोत : मुख्यमंत्री
याच भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाचाही आस्वाद घेतला. कोची येथील कोकणी भाषिक समुदायासोबत त्यांनी हा कार्यक्रम पाहिला. नंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी ‘मन की बात’ हा प्रेरणेचा स्रोत असल्याचे सांगितले. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मोदी यांनी, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताच्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकला. इस्रोने नुकतेच केलेले 100 वे यशस्वी रॉकेट प्रक्षेपण हा देशाच्या अंतराळ संशोधनातील वाढत्या पराक्रमाचा दाखला आहे, असे म्हणाले.