हॉकी चषकाचे मुख्यमंत्र्यांकडून अनावरण
वृत्तसंस्था / चेन्नई (तामिळनाडू)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेत विजेत्याला देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावरण बुधवारी येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धा चेन्नई मदुराई येथे होणार असून यास्पर्धेत एकूण 24 संघांचा समावेश आहे. यजमान भारताने सदर स्पर्धा यापूर्वी म्हणजे 2001 आणि 2016 साली अशी दोनवेळा जिंकली आहे. आता ही स्पर्धा मायदेशात होत असल्याने भारताला तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्याची संधी उपलब्ध आहे. या स्पर्धेचा काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये यजमान भारत ब गटात असून ओमान, चिली आणि स्वीस हे संघ या गटात आहेत. भारताचा सलामीचा सामना चिलीबरोबर 28 नोव्हेंबरला चेन्नईत होणार आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एन. के. स्टॅलिन यांनी हॉकी चषकाचे अनावरण केले. या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच क्रीडा युवजन खात्याचे मंत्री थिरु उदयनिधी स्टॅलिन, एन. मुरूगुनंददाम तसेच हॉकी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी तामिळनाडूमध्ये विविध स्टेडियम्स सज्ज करण्यात आली आहेत.