मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष दिल्लीत
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला उधाण : काही मंत्र्यांची चिंता वाढली
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष दामू नाईक दिल्लीत दाखल झाल्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. भाजपच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांशी या विषयावरुन पुन्हा एकदा बैठका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे काही मंत्री अस्वस्थ झाले असून त्यांची चिंता वाढल्याचे समोर आले आहे. अलिकडच्या काळात सावंत व नाईक या दोघांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या असून त्यांच्या भाजप वरिष्ठांशी बैठका वाढत आहेत. त्यातूनच काही मंत्र्यांना हटवले जाण्याची चर्चा सुरु असून ते मंत्री कोण? हे अद्याप स्पष्ट होत नसल्याने मंत्रिमंडळातही थोडी धुसफूस असल्याचे दिसून येत आहे. गोव्याचे अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर दोन्ही नेते दिल्लीस गेले होते. ते परतल्यानंतर त्यांना पुन्हा मंगळवारी दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. तथापि ते दोघेही एक दिवस आधीच म्हणजे सोमवारीच दिल्लीत पोहोचल्याने मंत्रिमंडळ फेरबदलासाठी गती आल्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी विधानसभा निवडणुका दोन वर्षावर आली असून ती हेरुनच फेरबदल करण्याचा भाजपचा इरादा असल्याचे दिसून येत आहे.