मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी सोशिकता गमावली
भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांचा आरोप
बेळगाव : मुख्यमंत्रिपद गमावण्याच्या भीतीने सिद्धरामय्या यांनी सोशिकता गमावली आहे. प्रामाणिक, निष्ठावंत अधिकाऱ्यांशी ते असभ्य वर्तन करीत आहेत. त्यांच्या वर्तनामुळे अधिकारीवर्गाला भीतीच्या छायेखाली काम करण्याची वेळ आली असल्याचा आरोप भाजपचे बेळगाव जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केला. सुभाष पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की मुख्यमंत्र्यांच्या वर्तनामुळे कर्तव्यदक्ष, निष्ठावंत सरकारी अधिकाऱ्यांचा अवमान होत आहे. व्यासपीठावर बोलावून जाहीरपणे अपमान करणे, एकवचनात बोलावणे यासारख्या प्रकारांमुळे निष्ठेने सेवा बजावणारे अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे प्रकार राज्यात सुरू आहेत. राज्याच्या खजिन्यात खडबडाट आहे.
काँग्रेस पक्षाचेच आमदार आपल्याच सरकारविरोधात बंडाळी करत आहेत. मुख्यमंत्री बदलावा, अशी मागणी जाहीरपणे करीत आहेत. सरकार दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी रागाच्या भरात पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केला. बेळगाव महानगराचे पोलीस कमिशनर कोण आहेत? हेच माहीत नसलेल्या सिद्धरामय्यांनी ‘ये, येथील एसपी कोण?’ असे म्हणत धारवाडहून बेळगावला बंदोबस्तासाठी आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी नारायण बरमनी यांच्या दिशेने हात उगारत गैरवर्तन केले. या प्रकारामुळे मानसिक धक्का पोहोचलेले बरमनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास पुढे झाले. यावरून काँग्रेस सरकारच्या कारभाराची झलक स्पष्टपणे दिसून येते, असा आरोपही सुभाष पाटील यांनी केला आहे.