मुख्यमंत्री ताफ्यासह आले अन् महामार्ग पाहणी करून गेले! पाहणी दौरा केवळ खड्डे भरण्यापुरताच
नुसते खड्डे भरून नकोत तर महामार्ग पूर्ण करा, जनआक्रोश समितीची मागणी
खेड प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी महामार्गाच्या दयनीय अवस्थेची पाहणी केली. शासकीय ताफ्यासह आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांचे महामार्ग जनआक्रोश समितीचे गाऱ्हाणे न ऐकताच वरवरचा पाहणी दौरा केल्याची टीका हाते आहे. महामार्ग पाहणी दौरा केवळ खड्डे बुजवण्यासाठी होता, असा आरोप करत नुसते खड्डे बुजवून नकोत, तर महामार्गाचे काम पूर्ण करा, अशी मागणी कोकणवासीयांसह जनआक्रोश विकास समितीने केली आहे.
गेल्या सतरा वर्षांपासून महामार्गाचे काम रखडल्याने कोकणवासियांकडून टिकेची झोड उठवण्यात येत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येरून ठेपलेला असतानाही अद्याप महामार्ग सुस्थितीत आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाहणी दौरे करून देखील अद्याप महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यातून वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सकाळी महामार्गावरील पळस्पे फाटा येथून सकाळी 12 वाजता दौऱ्यास प्रारंभ केला. नागोठणे, माणगाव, लोणेरे या ठिकाणच्या महामार्गाच्या दयनीय अवस्थेची शिंदे यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री दौऱ्यावर येण्यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग खात्यासह ठेकेधारक कंपनीने तातडीने खड्डे बुजवण्याचे कामदेखील हाती घेतले. एकीकडे ठेकेदार कंपनी खड्डे बुजवत असताना मागून मुख्यमंत्री पाहणी दौरा करत होते, असे महामार्ग जनआक्रोश समितीचे म्हणणे आहे.
महामार्गाची पाहणी करण्यासाठी शासकीय ताफ्यासह आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांचे म्हणणे ऐकूनच घेतले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. जन आक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची पळस्पे येथे भेट घेण्याचा प्रयत्न करत नुसता पाहणी दौरा नको, लेखी आश्वासनाची हमी हवी, अशी मागणीही केली.