मुख्यमंत्र्यांकडून आज मंत्र्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन
सर्व मंत्र्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न
बेंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये सत्तावाटप आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी सोमवारी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे उत्सुकताही निर्माण झाली आहे. राज्यात कोणतेही राजकीय बदल बिहार विधानसभा निवडणुकीनंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस होतील, हे स्पष्ट झाले आहे. मंत्र्यांना विश्वासात घेण्यासह भविष्यात राजकीय बदल झाल्यास मंत्री त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे वातावरण निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना डिनर पार्टीसाठी निमंत्रण दिले आहेत, असे म्हटले जात आहे.
राज्यातील काँग्रेस सरकारला अडीच वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिवकुमार गटातील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्पूर्वीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटाने मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे जाळे टाकले आहेत. या सर्वांमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी रात्री त्यांचे अधिकृत निवासस्थान कावेरी येथे सर्व मंत्र्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. सर्व मंत्र्यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे.
सत्तावाटपाच्या गोंधळाला रोखण्यासह पुढील अडीच वर्षे सत्तेत राहण्यास मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे जाळे टाकून मंत्री आणि आमदारांना धरून आपली शक्ती वाढवण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी मंत्र्यांसाठी मेजवानीचे आयोजन केले आहे, असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या डिनर पार्टीत सध्याच्या राजकीय घडामोडींसह अनेक मुद्दे चर्चेसाठी येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या डिनर पार्टीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.