मुख्यमंत्री-विरोधी पक्षनेते भेट
गावठी कोंबडीच्या उल्लेखावरून उपस्थितात हशा
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्याशी कामकाजाला सुरू होण्यापूर्वी चर्चा केली. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मुख्यमंत्र्यांनी काही मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी गावठी कोंबडीचा मुद्दाही चर्चेत आला. कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी ही भेट झाली. तत्पूर्वी विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर फरीद, सत्ताधारी पक्षाचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांचे आमनेसामने झाले. तब्येतीची चौकशी करून इतके बारीक कसे झाला? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आर. अशोक यांना विचारला. मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर अशोक यांनी आपण गावठी कोंबडी खायचे सोडले आहे, असे उत्तर दिले. यावर कोंबडी खाणे बंद करू नका, गावठी कोंबडी खात जा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. यावर दोन्ही नेते व उपस्थित आमदारांमध्ये हशा पिकला.