दिल्लीतील गोमंतकीयांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
विविध मतदारसंघांत भाजप प्रचारात सहभाग
पणजी : विधानसभा निवडणूक प्रचारानिमित्त दिल्लीत भेटीवर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तेथे विविध भागात स्थायिक गोमंतकीयांशी संवाद साधला. त्यात कोकणी तसेच मराठी भाषिक लोकांना ते भेटले. सध्या दिल्लीत भाजपचा प्रचार जोमाने सुरू आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. भाजप उमेदवारांच्या प्रचार रॅलीतही ते सहभागी झाले. दिल्लीत करोलबाग तसेच राजेंद्रनगर भागात असंख्य गोमंतकीय स्थायिक झालेले आहेत. या लोकांनी रविवारी करोलबाग येथे मराठा मित्र मंडळातर्फे मकर संक्रांती कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तेथे हजेरी लावत त्या लोकांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत माजी मंत्री भागवत कराड यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजेंद्रनगर येथे सरस्वती संस्कृती भवनात अनेक कोकणी भाषिक लोकांशी संवाद साधला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मोतीनगर मतदारसंघांत हरिश खुराणा यांच्या प्रचारसभेस संबोधित केले. दिल्लीचा विकास तसेच विकसित दिल्लीसाठी भाजपला मतदान करावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी त्यावेळी केले.