मुख्यमंत्र्यांची निकटवर्तीय मंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा
राजकीय वर्तुळात तीव्र कुतूहल : खात्यात इतरांचा हस्तक्षेप वाढल्याची मंत्र्यांकडून तक्रार
बेंगळूर : नोव्हेंबरमध्ये राज्यात मोठे राजकीय बदल होतील, अशी चर्चा रंगलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सकाळी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, मंत्री एच. सी. महादेवप्पा, सतीश जारकीहोळी यांची स्वतंत्र बैठक घेतली होती. त्यांनी रात्री पुन्हा निकटवर्तीय मंत्र्यांची बैठक घेत चर्चा केली आहे. सोमवारी भोजनावळीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वीच त्यांनी निकटवर्तीय मंत्र्यांची स्वतंत्रपणे बैठक घेतल्याने तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी सकाळी आणि रात्री आपल्या समर्थक मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेऊन अनेक गंभीर मुद्द्यांवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. आपल्या खात्यात इतरांचा हस्तक्षेप वाढत असल्याबद्दल काही मंत्र्यांमध्ये नाराजी आहे.
ज्येष्ठ असून देखील काही प्रभावी नेत्यांच्या शब्दापुढे झुकावे लागत आहे. कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय अनेक फाईलींची पडताळणी होत असल्याचा आक्षेप काहींनी मुख्यमंत्र्याकडे घेतला आहे. बैठकीत प्रामुख्याने अंतर्गत आरक्षण आणि अनुसूचित जमातींमध्ये कुरुब (धनगर) समुदायाचा समावेश करण्याबाबत केंद्राकडे शिफारस करण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते. कुरुब समुदायाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबत तत्कालिन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. त्यावर केंद्राने राज्य सरकारला पत्र पाठवून काही स्पष्टीकरण मागितले आहे. कुरुब समुदायाला अनुसूचित जमातीत स्थान देण्यास माजी खासदार व्ही. एस. उग्रप्पा यांनी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर उघडपणे आक्षेप व्यक्त केला होता.
एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्रिपदांची मागणी?
बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्यानंतर अनुसूचित जमाती कल्याण खाते मुख्यमंत्र्यांजवळ आहे. केंद्र सरकारने स्पष्टीकरण मागितल्याने अधिक तपशिल जमा करण्यासह आवश्यक शिफारशी करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर समुदायाच्या हितरक्षणासाठी समुदायातील प्रभावी नेते सतीश जारकीहोळी देखील मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या स्वतंत्र बैठकीत सहभागी झाले होते. याच प्रसंगी आणखी उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्यासाठी काँग्रेस हायकमांडवर दबाव आणण्यासाठी चर्चा करण्यात आल्याचे समजते. याचवेळी मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयीही चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
बैठका घेणे नवे नाही : डॉ. परमेश्वर
मंत्रिमंडळातील नेते सातत्याने बैठका घेणे नवीन नाही. काही मुद्दे संवेदनशील असून मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्यावर स्वतंत्रपणे चर्चा केली आहे, असे समर्थन गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केले आहे. अशा प्रकारची ही पहिली बैठक नाही. याआधी सतीश जारकीहोळी, महादेवप्पा यांच्या निवासस्थानीही बैठक घेऊन चर्चा केली आहे, असेही ते म्हणाले.