मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री नवी दिल्लीत
गोव्यात मात्र राजकीय चर्चेला उधाण
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे दोघेही नवी दिल्लीला पोहोचले असून दोघांनीही विविध नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे चालू केले आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या फेररचनेच्या अनुषंगाने दोन्ही नेते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील, असा अंदाज आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी मात्र हा योगायोग असल्याचे सांगितले. मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा निर्णय व अधिकार हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येते, याचा पुनरुच्चारही नाईक यांनी केला. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आरोग्यमंत्रीही दिल्लीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोघांनाही पक्षश्रेष्ठींनी चर्चेसाठी बोलावल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या नवी दिल्ली दौऱ्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून आगामी विधानसभा अधिवेशनापूर्वीचे काही विषय त्यांच्यासमोर मांडत आहेत. आपल्या या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. आमदार गोविंद गावडे यांना मंत्रीपदावरून हटविल्यानंतर आता मुख्यमंत्री विविध नेत्यांशी नवी दिल्लीत चर्चा करणार आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे आरोग्य खात्यातील काही विषय तसेच वन खात्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. मात्र राजकीय क्षेत्रात बरीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री दिल्लीत हा योगायोग
पत्रकारांनी प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नाईक यांना विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री अनेक नेत्यांशी चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीला गेले आहेत. त्यांची नवी दिल्लीची भेट पूर्वनियोजित होती. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे अन्य काही खात्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहेत. दोघेजण एकाच वेळी नवी दिल्लीत हा योगायोग आहे. तथापि मंत्रिमंडळाच्या फेररचनेचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत आणि ते योग्य वेळी निर्णय घेतील.