For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री-राज्यपाल भेटीने उत्सुकता

12:52 PM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री राज्यपाल भेटीने उत्सुकता
Advertisement

सदिच्छा भेट की राजकीय कारणावरुन अफवा? : चार महाविद्यालयांच्या स्थलांतराविषयी चर्चा

Advertisement

पणजी : मंत्रिमंडळात फेरबदलाच्या वाढत्या अफवांच्या पार्श्वभूमीवर काल बुधवारी सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. लोकांनी ‘कुणाला डच्चू मिळणार, कुणाची वर्णी लागणार?’, यासंबंधीचे अंदाजही बांधण्यास सुऊवात केली.

2022 मध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यास आता निम्म्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यामुळे किमान काही असंतुष्टांना तरी मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, अशा अटकळी बांधण्यात येत होत्या. दिगंबर कामत यांच्यासारखी मुख्यमंत्रीपदी राहिलेली  व्यक्ती सुद्धा अद्याप आमदारकीवरच समाधान मानून भाजपला पाठिंबा देत आहे. त्याशिवाय काँग्रेसमधून आलेले अन्य काही आमदारही मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा बाळगून आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाचे गांभीर्य वाढले असून ते वारंवार लांबणीवर पडत असल्याने अफवांचा ‘मोहोर’ येत असतो.

Advertisement

त्यातूनच गुऊवारी अचानक मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यामुळे या चर्चेत अधिकच भर पडली व लोकांनी आराखडे बांधण्यास सुऊवात केली. 40 सदस्यीय विधानसभेत भाजपचे 28, मगोचे 2 आणि 3 अपक्ष असे स्पष्ट बहुमत भाजपकडे आहे. त्यामधील त्यांचे स्वत:चे  11 आणि मित्रपक्ष मगोचा 1 सदस्य यांचा सामवेश असलेले सरकार डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आहे. या मंत्रिमंडळात एप्रिलमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तत्पूर्वी गत महिन्यात अनेकदा मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या दिल्लीवाऱ्याही पार पडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली राज्यपालांची भेट ही त्याचाच भाग असावी, असाही अनेकांचा समज झाला होता. म्हणूनच चर्चेला ऊत आला होता.

मुख्यमंत्र्यांनी या सर्व अटकळी फेटाळून लावताना योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, तसेच कोणताही फेरबदल होणार असेल तर एक दिवस आधी जाहीर करण्यात येईल, असे यापूर्वीच स्पष्ट केले. त्याचबरोबर प्रत्यक्ष जाहीर न झालेल्या तारखांवर लोकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले होते  व आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तास्थानी आणण्याच्या दृष्टीने काही फेरबदल खात्रीने करण्यात येतील, असेही म्हटले होते.

चार महाविद्यालये जाणार विद्यापीठ कॅम्पसमध्ये

प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री राज्यपाल भेट ही राजकीय विषयापेक्षा प्रामुख्याने एका शैक्षणिक महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी होती, असे समजले आहे. या बैठकीचा मुख्य हेतू म्हणजे एकात्मिक शैक्षणिक कॅम्पस अंतर्गत राज्याच्या उच्च शिक्षण व्यवस्थेला एकत्रित करण्याच्या मोठ्या धोरणाचा भाग म्हणून या प्रस्तावाकडे पाहिले जात आहे. त्याद्वारे पणजी शहरासह आल्तीनो आदी भागात असलेली फार्मसी, संगीत, फाईन आर्ट्स आणि वास्तुशिल्पकला ही चार सरकारी महाविद्यालये गोवा विद्यापीठ कॅम्पसमध्ये स्थलांतरित करण्याची सरकारची योजना आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी अर्थसंकल्पातही मुख्यमंत्र्यांनी चार महाविद्यालयांचे विद्यापीठ कॅम्पसमध्ये स्थलांतरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

Advertisement
Tags :

.