For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुडा प्रकरणात मुख्यमंत्र्यांना दिलासा

06:51 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुडा प्रकरणात मुख्यमंत्र्यांना दिलासा
Advertisement

लोकायुक्त विभागाने सादर केलेला बी रिपोर्ट विशेष न्यायालयाकडून मान्य

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) कथित बेकायदा भूखंड वाटप प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास केलेल्या लोकायुक्त विभागाने सादर केलेला ‘बी रिपोर्ट’ बेंगळूरमधील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने मान्य केला आहे. त्यामुळे कायदेशीर लढ्यात सिद्धरामय्या यांना यश आले असून ते या प्रकरणात कलंकमुक्त झाले आहेत.

Advertisement

मुडा प्रकरणात आरोप असणारे सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी पार्वती बी. एम., मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी, देवराजू या दिलासा मिळाला आहे. उर्वरित आरोपींविरुद्ध चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुडाच्या बेकायदा भूखंड वाटप प्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी सिद्धरामय्या, पार्वती, मल्लिकार्जुन स्वामी, देवराजू यांच्याविरुद्ध न्यायालयात बी. रिपोर्ट सादर केला होता. त्यावर म्हैसूरमधील सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्ण यांनी आक्षेप घेत बेंगळूरच्या लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. वाद-युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने बी रिपोर्ट मान्य करत स्नेहमयी कृष्ण यांची याचिका फेटाळून लावली. तसेच उर्वरित आरोपींची चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सुनावणीदरम्यान लोकप्रतिनिधी न्यायालयाचे न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी, यापूर्वी लोकायुक्त पोलिसांनी अनेकदा आरोपपत्र दाखल केले आहेत. मात्र, अंतिम अहवाल का सादर केला जात नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यावर लोकायुक्त पोलिसांच्यावतीने विशेष सरकारी वकिलांनी, अंतिम तपास अहवाल तयार आहे. मात्र, परवानगी मिळत नसल्याने तो सादर केला जात नाही. थोडीशी मुदत दिली तर बंद लिफाफ्यात अहवाल देण्याची तयारी आहे, असे सांगितले होते.

सिद्धरामय्यांना तूर्तास दिलासा...

न्यायालयाने लोकायुक्त तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेला बी रिपोर्ट मान्य केल्यामुळे सिद्धरामय्या यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र, तक्रारदार स्नेहमयी कृष्ण यांच्यासमोर लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय आहे. त्यामुळे स्नेहमयी कृष्ण यांच्या पुढील भूमिकेवर राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

एखाद्या वेळेस विशेष न्यायालयाने बी रिपोर्ट फेटाळला असता तर सिद्धरामय्या यांच्या अडचणीत भर पडली असती. त्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला असता.

Advertisement
Tags :

.