For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री ठणठणीत, आज परतणार गोव्यात

01:12 PM Mar 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री ठणठणीत  आज परतणार गोव्यात
Advertisement

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे झाली अँजिओप्लास्टी : मान्यवरांकडून प्रकृतीची विचारपूस

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना काल, शुक्रवारी दुपारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  डॉक्टरांनी त्यांना प्रवासासाठी तंदुरुस्त घोषित केले आहे. ते आज शनिवारी गोव्यात परतणार आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे चेअरमन आणि मुख्य हृदयरोगतज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गुरुवारी सायंकाळी नियमित तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले होते.

डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या सर्व चाचण्यांचे अहवाल चांगले आल्यानंतर त्यांना वॉर्डमध्ये हलवण्यात आले व त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारचा दिवस पुण्यातच त्यांच्या कुटुंबासोबत घालवला. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचे पाहून गोव्यातील कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गोव्यातील मंत्रिमंडळातील सदस्य आणि इतर नेते सातत्याने संपर्कात होते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे मुख्यमंत्र्यांच्या उपचारांबाबत व प्रकृतीबाबत पुण्यातील रुग्णालयीन प्रशासनाच्या संपर्कात होते.  केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, त्याचबरोबरच सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याची विचारपूस केली.

मी पूर्णपणे तंदुरुस्त : मुख्यमंत्री

रुग्णालयातून बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हितचिंतकांसाठी व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात त्यांनी म्हटले की, “अफवांवर विश्वास ठेवू नका; मी केवळ नियमित वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झालो होतो आणि आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.”

Advertisement
Tags :

.