मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी शिरोळ तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या भेटीला
शिरोळ -
राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी शिरोळ तालुक्यातील लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्याच्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड मार्गालगत असलेल्या टारे मल्टिपर्पज हॉल येथे या मंगळवारी दुपारी २ वाजता विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिलांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर हे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिरोळ विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात विविध विकासकामे राबवण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्यात तब्बल २ हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली असून यात रस्ते, आरोग्य सुविधा, क्षारपडचा पायलट प्रोजेक्ट, सांस्कृतिक हॉल आदी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. विशेषत: महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये शिरोळ तालुका आघाडीवर आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पेन्शन योजना, महिला बचत गटांना प्रोत्साहन आणि मुलींना मोफत शिक्षण,एसटीचा प्रवासात ५० टक्के सवलत, दवाखान्याची सोय मोफत यासह अन्य शासकीय योजनांचा लाभ देऊन तालुक्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून झाला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या योजना प्रभावी ठरत असून त्यातून महिलांचा सहभाग वाढत आहे. शिरोळ तालुक्यातील महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात शिरोळ हा जिल्ह्यातील आघाडीचा तालुका ठरला आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून शिरोळ तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मेळाव्यात प्रमुख पदाधिकारी, शिरोळ तालुक्यातील महिला प्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.