मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याशी चर्चा
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा करून रात्री उशिरा गोव्यात परतले. तत्पूर्वी नवी दिल्ली विमानतळावरून दैनिक ‘तऊण भारत’शी बोलताना त्यांनी आपल्या दिल्ली भेटीबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रत्येक राज्याबरोबर तीन कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा करतात. त्या त्या राज्यात कशा पद्धतीने भारतीय दंड संहितेची अंमलबजावणी होतेय आदिची माहिती घेतात. आपल्याही काही सूचना ते राज्यांना करतात.
सोमवारची बैठक ही गोव्यासाठीची होती. आपण तसेच राज्याचे मुख्य सचिव कंदवेलू व इतर काही अधिकारी उपस्थित होते. गोव्यामध्ये पोलिसांनी काही नवीन पद्धतीची अंमलबजावणी केलेली आहे त्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देण्यात आली. त्यांना ती संकल्पना खूपच आवडली. हे नेमके कशा पद्धतीने करीत आहात याची माहिती आपल्याला सादर करा, जेणेकरून या नियमावलीची अंमलबजावणी इतर राज्यांना देखील करता येईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.
भारतीय न्याय संहिता या अनुषंगाने सदर बैठकीत कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात सखोल व सविस्तर चर्चा झाली आणि सदर बैठक अत्यंत यशस्वी झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत गोव्याच्या राजकीय परिस्थितीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दिल्लीच्या भेटीत डॉ. सावंत यांनी ‘टेरी’ या संस्थेला भेट दिली. द एनर्जी अॅण्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (टेरी) ही संस्था शेती, पर्यावरण, उद्योग अशा विविध विषयांवर आणि क्षेत्रात संशोधनाचे काम करते. गोव्यासाठी त्या संशोधनाचा कशा प्रकारे उपयोग करता येईल याबाबत ‘टेरी’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे डॉ. सावंत यांनी संवाद साधला. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गोव्यात येऊन पाहणी करावी अशी सूचना डॉ. सावंत यांनी त्यांना केली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी गोव्यातील विषयांवर चर्चा केली.