मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तातडीने दिल्लीला रवाना
लोकसभा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता
पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तातडीच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अचानक खास विमानाने दिल्लीला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 रोजी गोव्यात येत असून तत्पूर्वी लोकसभा उमेदवारांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. यासाठीच विचारविनिमय करण्याकरिता मुख्यमंत्र्यांना तातडीने बोलावणे आले असावे, असा अंदाज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे येथून दुपारी तातडीने दिल्लीला एका खास विमानाने रवाना झाले. सायंकाळी उशिरा ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले त्याचबरोबर या बैठकीवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष न•ा हे देखील उपस्थित होते या बैठकीवेळी गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप निर्विवादपणे कशा पद्धतीने बहुमत मिळेल यासंदर्भात रणनीती निश्चित करण्यात आली. बैठकीचा सविस्तर तपशील समजू शकला नाही. मात्र उत्तर गोव्यात विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना उमेदवारी पुन्हा एकदा दिली जाणार की नाही याबाबत शंका उत्पन्न झाली आहे. मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार दयानंद सोपटे यांचे नावही उत्तर गोव्यासाठी भाजपने चर्चेत घेतले आहे.
दक्षिण गोव्यात दिगंबर कामत यांचे नाव घेण्यात आले आहे. दिगंबर कामत हे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नसल्याचे कळविले होते. तथापि त्यांचे नाव अद्याप चर्चेमध्ये आहे. याशिवाय माजी खासदार नरेंद्र सावईकर व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे नावही विचारात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना शुक्रवारी विधानसभा अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याने गोव्यात एकच खळबळ माजली. त्यातच सभापती रमेश तवडकर यांनी पहिली विधानसभा अधिवेशन चालू असताना कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करून केलेल्या टीकेने राज्यातील राजकारणात रंग आणला आणि एकच खळबळ माजवून दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना दिल्लीत तातडीने बोलावून घेतल्याने गोव्यात उलटसुलट चर्चा चालू झाली आहे राजकारणात काहीही घडते या आधारावर मुख्यमंत्र्यांबरोबर नेमकी कोणती चर्चा झाली असेल हे कळायला थोडा अवधी लागणार.