भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत सातव्या स्थानी
प्रतिनिधी/ पणजी
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने विविध राज्यांतील स्टार प्रचारक म्हणून देशातील ज्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली आहे, त्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सातवे स्थान दिले आहे. याविषयीची यादी भाजपने जाहीर केलेली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असल्याने या ठिकाणी प्रचारासाठी भाजपचे बडे नेते जनतेशी संवाद साधणार आहेत. या निवडणुकीचाच एक भाग म्हणून भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश न•ा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर सातव्या स्थानी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर भूपेंद्रभाई पटेल (गुजरात), विष्णू साई (छत्तीसगड), मोहन यादव (मध्य प्रदेश), भजनलाल शर्मा (राजस्थान), नायब सिंग सिनाई (हरियाणा), हिमांता बिस्वा शर्मा (आसाम), शिवराज सिंह चौहान (मध्यप्रदेश), देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र) यांच्याशिवाय बड्या नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, शिव प्रकाश, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, नारायण राणे, पियुष गोएल, ज्योतिरादित्य सिंधिया, रावसाहेब दानवे पाटील, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंड्यो, चंद्रकांत (दादा) पाटील, सुधीर मुनगुंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, रविंद्र चव्हाण, स्मृती इराणी, प्रवीण दरेकर, अमर साबळे, मुरलीधर मोहोल, अशोक नेटे, संजय कुटे, नवनीत राणा यांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे.