For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री बदल ही प्रसारमाध्यमांची निर्मिती

06:24 AM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री बदल ही प्रसारमाध्यमांची निर्मिती
Advertisement

राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण : विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत सहभागी

Advertisement

बेंगळूर : राज्यात अधिकार हस्तांतरावरून अनेक नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये होत असतानाच काँग्रेस हायकमांडने गोंधळावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात मुख्यमंत्री बदल ही प्रसारमाध्यमांची निर्मिती आहे. मुख्यमंत्री बदलही नाही अन् अधिकाराचे हस्तांतरही नाही, असे राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे. बेंगळूरमध्ये राज्य सरकारमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींविषयी सुरजेवाला यांनी सोमवारी काँग्रेस विधिमंडळातील नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत.

मुख्यमंत्री बदलणार, सत्तेचे हस्तांतरण होईल, अशी अफवा पसरविणे योग्य नाही. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून सुरजेवाला यांनी सिद्धरामय्या यांची खुर्ची शाबूत असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. त्या पक्षातील नेते एकमेकांविरोधात कुरघोडी करत आहेत. आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ हे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर परखड टीका करत आहेत. त्यांच्या पक्षातील गटबाजी लपविण्यासाठी काँग्रेसवर टीका करत आहेत. कर्नाटकात सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजनांनी देशात लौकिक मिळविला आहे. यामुळे भाजप नेते हताश झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसविरोधात खोटे आरोप केले आहेत, असेही सुरजेवाला म्हणाले.

Advertisement

उघडपणे वक्तव्ये नको!

तत्पूर्वी काँग्रेस विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री बदल, प्रदेशाध्यक्ष बदलासंबंधी कोणीही उघडपणे वक्तव्ये करू नयेत, अशी ताकीद दिली. कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. पक्षाच्या नियमांच्या चौकटीत राहूनच सर्वांनी काम करावे, अशी सूचनाही त्यांनी मंत्री आणि पक्षाच्या आमदारांना दिल्याचे समजते.

सरकारपेक्षा पक्ष महत्त्वाचा : लक्ष्मी हेब्बाळकर

राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये कोणताही गोंधळ नाही. आम्हाला सरकारपेक्षा पक्ष  अधिक महत्त्वाचा आहे. जर पक्ष असेल तर सरकार स्थापन करणे शक्य आहे. शतकाचा इतिहास असलेल्या या पक्षाची स्वत:ची एक वचनबद्धता आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. सत्तावाटपाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, मी पक्षाची एक शिस्तबद्ध शिपाई आहे. मुख्यमंत्री बदलाचा अधिकार हायकमांडवर अवलंबून आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचना ही केवळ चर्चा आहे. यावरही हायकमांडच निर्णय घेईल, असे त्या म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.