पर्पल महोत्सव यंदा 9 ते 12 ऑक्टोबरला : मुख्यमंत्री
15 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींचा राहणार सहभाग नोंदणीसाठी वेबसाईट, अॅपची सुविधा : दिव्यांगांना भेडसावणाऱ्या समस्यांवर होणार चर्चा
पणजी : दिव्यांगांसाठी असलेला कला, क्रीडा आणि तंत्रज्ञान महोत्सव (पर्पल) यंदा 9 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेतून दिली. ते म्हणाले की, ‘थिंक इनक्ल्युजीव युनिव्हर्सल डिझाईन फॉर एव्हरीवन’ अशी त्या पर्पल महोत्सवाची संकल्पना असून 15 हून अधिक देशांचा सहभाग त्यात निश्चित झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ (युनेस्को), सामाजिक न्याय सशक्तीकरण मंत्रालयाच्या सहकार्याने हा महोत्सव आखण्यात आला आहे. दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्यावर महोत्सवात भर देण्यात येणार आहे. गोव्यात यापूर्वी झालेल्या पर्पल महोत्सवाची सर्वत्र स्तुती झाली होती. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील गोव्यातील पर्पल महोत्सवाचे कौतुक केले होते. गोव्यातील आदर्श डोळ्dयासमोर ठेवून इतर राज्यांनी देखील हा महोत्सव सुरु केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
मागील महोत्सवात 15 देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला होता. यंदाही 15 हून जास्त देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागात तर त्यांना अनेक अडचणी भेडसावतात. आरोग्य, शिक्षण, वाहतूक या सेवांचा लाभ त्यांना घेता येत नाही. त्यावर काय उपाययोजना करता येतील यावर महोत्सवात चर्चा होणार आहे. त्यांना लागणारी उपकरणे, अभ्यासाची साधने यांची निर्मिती यावर महोत्सवात विचारमंथन केले जाणार आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेसोबत सामावून घेणे आणि त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी हा महोत्सव आखण्यात आला आहे. प्रतिनिधींची नोंदणी करण्यासाठी वेबसाईट व अॅपची सुविधा देण्यात आली असून डॉ. सावंत यांनी त्यावेळी अॅपचा शुभारंभ केला. दिव्यांगांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी व घेण्यासाठी तंत्रज्ञान तयार करण्याचे आव्हान असून ते पेलावे कसे? यावर महोत्सवात चर्चा होणार आहे. महोत्सवात जलक्रीडा, पॅरासोलिंग, स्कूबा डायविंग व इतर प्रकार होणार असून त्यात दिव्यांगांना समावून घेतले जाणार आहे. सर्व प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यासाठी महोत्सवात आखण्यात आले आहेत.