चिडिया उडचा ट्रेलर प्रदर्शित
जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत
जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर आणि भूमिका मीणा यांची वेबसीरिज ‘चिडिया उड’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. नवी क्राइम ड्रामा वेबसीरिज ओटीटीवर मोफत उपलब्ध होणार आहे. सीरिजची कहाणी 1990 च्या दशकातील मुंबईवर आधारित आहे. यात अंडरवर्ल्ड असून देहविक्रयाशी संबंधित भाग दाखविण्यात आले असून गावातून आलेल्या युवतींचे अंतहीन दु:ख आणि या सर्वांतून बाहेर पडण्यासाठीचा संघर्ष प्रभावीपणे दाखविण्यात आला आहे.
रवि जाधव यांच्या दिग्दर्शनातील या वेबसीरिजची कहाणी मोहिंदर प्रताप सिंह आणि चिंतन गांधी यांनी लिहिली आहे. चिडिया उड ही सीरिज आबिद सुरती यांची प्रसिद्ध कादंबरी केजवर आधारित आहे. यात जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत आहेत, तर भूमिका मीणा नायिकेच्या भूमिकेत आहे. तसेच सिकंदर खेर, मधुर मित्तल, मयूर मोरे आणि मीता वशिष्ठ हे कलाकारही यात दिसून येतील.
या सीरिजची निर्मिती हरमन बावेजा आणि विक्की बहरी यांनी केली आहे. याच्या कहाणीच्या मुख्य स्थानी सहर (भूमिका मीणा) नावाची मुलगी आहे, जी राजस्थानच्या एका गावातून स्वप्नांची भरारी घेत मुंबईत आलेली असते. परंतु गुन्हे आणि देहविक्रयाच्या दलदलीत अडकते. स्वत:ला या दुष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी ती लढत असते. परंतु तिच्यासमोर कादिर खान (जॅक श्रॉफ)चा अडथळा असतो.
चिडिया उडचे जग उतारचढावाने भरलेले आहे. ही एक अशा जागेची कहाणी आहे, जेथे जिवंत राहणेच अंतिम खेळ आहे आणि प्रत्येक व्यक्तिरेखा स्वत:ची लढाई लडत आहे असे उद्गार जॅकी श्रॉफ यांनी काढले आहेत. चिडिया उड ही वेबसीरिज 15 जानेवारी रोजी अमेझॉन एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होईल.