चिदंबरम रॅपिड विभागात संयुक्त अव्वल स्थानावर
वृत्तसंस्था/ वॉर्सा, पोलंड
दबावाखाली चांगली कामगिरी करताना भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने अंतिम गेममध्ये फ्रेंच खेळाडू अलिरेझा फिरोजाला हरवून ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सुपरबेट रॅपिड व ब्लिट्झ स्पर्धेच्या रॅपिड विभागात 11 गुणांसह संयुक्तपणे पहिले स्थान पटकावले.
वाईल्ड कार्डवर प्रवेश केलेल्या चिंदबरमला फिरोजा आणि स्लोव्हेनियन व्लादिमीर फेडोसेव्ह यांच्याशी गुणांच्या बाबतीत बरोबरी करायची होती आणि तो थोड्याशा अडचणींनंतर भाग्यवान ठरला. कारण फ्रेंच खेळाडूने अंतिम टप्प्यात वेळीच पराभव पत्करला. दुसरीकडे, आर. प्रज्ञानंदने स्पर्धेत पुनरागमन करत शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे रोमानियन डेव्हिड गॅव्हरिलेस्कू आणि डुडा यांच्यावर महत्त्वपूर्ण विजय मिळवत संयुक्तपणे चौथे स्थान पटकावले. प्रज्ञानंदची गुणसंख्या 10 वर जाऊन अमेरिकन लेव्हॉन आरोनियनसह त्याला चौथे स्थान मिळाले आहे.
टूरच्या पहिल्या स्पर्धेत अद्याप 18 ब्लिट्झ सामने शिल्लक असून फ्रान्सचा मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह नऊ गुणांसह फारसा मागे नाही. तो डुडा आणि रोमानियाच्या डीक बोगदान डॅनियलपेक्षा पूर्ण गुणाने पुढे आहे. गॅव्हरिलेस्कू दहा खेळाडूंच्या या स्पर्धेत सात गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तो माजी विश्वविजेता वेसेलिन टोपालोव्हपेक्षा पुढे आहे. टोपोलोव्ह शेवटच्या स्थानावर आहे.
अरविंदने दिवसाची सुऊवात डुडावर विजय मिळवून केली. आठव्या फेरीत अरविंद वाचियर-लाग्रेव्हकडून पराभूत झाला परंतु त्यामुळे त्याच्या आशा कमी झाल्या नाहीत आणि फिरोजावर शेवटी विजय मिळवल्याने भारतीय खेळाडू जलद विभागात अव्वल स्थानावर राहील हे निश्चित झाले. पहिल्या सहा सामन्यांतून फक्त पाच गुण मिळवता आलेल्या प्रज्ञानंदने आधी फेडोसेव्हसोबत बरोबरी साधली आणि नंतर शेवटच्या सामन्यांत विजयांची नोंद केली.