चिकन, मटण व्यवसाय ‘लाल’ वर्गवारीत
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कार्यवाही, ‘हिरवी श्रेणी’ रद्द
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात चालणाऱ्या चिकन, मटण दुकानांना ‘हिरवी श्रेणी’ उद्योगाचा दर्जा देण्याची कृती म्हणजे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 चे उल्लंघन आहे, अशी टीका गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर झाल्यानंतर हा तीव्र विरोध लक्षात घेत मंडळाने आता या दुकानांना ‘लाल श्रेणी’त वर्गीकृत केले आहे. त्यामुळे अशा दुकानमालकांना यापुढे जल आणि वायू कायद्यांतर्गत मंजुरी मिळविणे आवश्यक बनले आहे.
मंडळाकडून गतवर्षी अनेक चिकन, मटण विक्री दुकानांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यांचे गुणांकन केल्यानंतर गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत मंडळाने या व्यवसायास ‘हिरव्या’ वर्गवारीत समाविष्ट करण्यास मान्यता दिली होती. मात्र त्यावरून राज्यातील विविध संस्था, संघटना, मंडळे, विश्वस्त संस्था आदींकडून मंडळास निवेदने सादर करून जोरदार टीका करण्यात आली. तसेच सदर निर्णयास विरोधही करण्यात आला. या निवेदनांमध्ये त्यांनी कत्तलखान्यांना कत्तल करण्यास परवानगी देणे तसेच हिरवी आणि लाल वर्गवारी देण्याच्या प्रक्रियेसंबंधी विस्तृत माहिती दिली होती.
त्यानंतर मंडळाने यंदा गत जून महिन्यात पुन्हा त्यांचे नमुने तपासले असता त्यात विविध त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे दि. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत मंडळाने सदर व्यवसाय ‘लाल’ श्रेणीत वर्गीकृत करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील चिकन, मटण दुकाने, केंद्र यांच्या श्रेणी वर्गीकृत करण्याबाबत झालेल्या सदर बैठकीत सखोल विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर अशा सर्व युनिट्सना ‘लाल’ श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले. लवकरच मंडळाकडून नोंदणीकृत 19 युनिट्सना लाल श्रेणीचे पुनर्वर्गीकरण करण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात येणार आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पक्ष्यांची कत्तल (म्हणजेच लाल, नारिंगी, हिरवी श्रेणी) वर्गीकरण केले जात नाही. त्यामुळे राज्य मंडळाने त्यांचे वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे मंडळाने यापूर्वी म्हटले होते. दरम्यान, मंडळाने आता खाजगी कत्तलखाने, दुकाने यांनी त्यांचे सांडपाणी सेप्टिक टँक किंवा सोकपिटमध्ये टाकावे, असे निर्देश दिले आहेत.