छत्तीसगड 241 धावांनी पिछाडीवर
वृत्तसंस्था / मुंबई
2025-26 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या इलाईट ड गटातील सामन्यात सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर मुंबई विरुद्ध खेळताना छत्तीसगडचा संघ 241 धावांनी पिछाडीवर राहिला आहे.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 416 धावांचा डोंगर उभा केला. अजिंक्य रहाणेने 303 चेंडूत 21 चौकारांसह 159 तर सिद्धेश लाडने 13 चौकारांसह 80, आकाश आनंदने 5 चौकारांसह 61, कर्णधार शार्दुल ठाकुरने 4 चौकारांसह 29 तसेच मुलानीने 4 चौकारांसह 39 धावा जमविल्या. मुंबईने 8 बाद 406 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे दोन गडी केवळ 10 धावांची भर घालत तंबूत परतले. छत्तीसगडतर्फे आदित्य सरवटेने 103 धावांत 5 तर रवीकिरणने 53 धावांत 3 व मंडलने 102 धावांत 2 गडी बाद केले.
छत्तीसगडने आपल्या डावाला सुरूवात केली. आयुष पांडे आणि शशांक चंद्रकार यांनी सलामीच्या गड्यासाठी 85 धावांची भागिदारी केली. आयुष पांडेने 7 चौकारांसह 50 धावा जमविल्या. शशांक चंद्रकारने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 43 धावा केल्या. आशुतोष सिंगने 3 चौकारांसह 34 धावा जमविल्या. शशांक सिंग 20 धावांवर खेळत आहे. छत्तीसगडने दिवसअखेर पहिल्या डावात 60.3 षटकात 6 बाद 175 धावा जमविल्या. मुंबईतर्फे मुलानी, हिमांशु सिंग आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हा सामना आता अनिर्णीत अवस्थेकडे झुकला आहे.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव सर्वबाद 416 (रहाणे 159, लाड 80, आकाश आनंद 61, मुलानी 39, ठाकुर 29, सरवटे 5-103, रवीकिरण 3-53, मंडल 2-102), छत्तीसगड प. डाव 6 बाद 175 (आयुष पांडे 50, शशांक चंद्रकार 43, आशुतोष सिंग 34, शशांक सिंग खेळत आहे 20, मुलानी, हिमांशु सिंग आणि मुशीर खान प्रत्येकी 2 बळी).