For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगड मध्यप्रदेशच्याच वाटेवर...

06:21 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगड  मध्यप्रदेशच्याच वाटेवर
Advertisement

थोडी पार्श्वभूमी

Advertisement

? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही दोन आता भिन्न राज्ये असली तरी, त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीत गेली 20 वर्षे, अर्थात छत्तीसगडच्या निर्मितीनंतर ज्या निवडणुका झाल्या आहेत, त्या काळात विलक्षण साम्य आहे. पूर्वी छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेशाचाच भाग होते, म्हणून असे साम्य शक्य आहे.

?2003 मध्ये या राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. ती मध्यप्रदेशप्रमाणेच 15 वर्षे टिकली. या सर्व काळात रमणसिंग हे मुख्यमंत्री होते. या काळातील सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला राज्यातील 11 पैकी सातपेक्षा कमी जागा कधी मिळाल्या नाहीत. त्यामुळे हा पक्षाचा गड आहे.

Advertisement

विधानसभा पराभवानंतरही...

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला होता. 90 जागांपैकी केवळ 15 जागी यश मिळाले होते. त्यामुळे पुढची किमान 10 वर्षे पक्षाला या राज्यात विरोधी पक्षातच बसावे लागणार, अशी अनेक विश्लेषकांची समजूत होती. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने 11 पैकी 9 जागांवर विजय मिळवून आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते प्राप्त करुन विधानसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढले होते. ते एक आश्चर्य होते.

अनपेक्षित विजयही...

2023 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जवळपास सर्व निवडणूक तज्ञांनी या राज्यात पुन्हा काँग्रेसच विजयी होणार असा निष्कर्ष काढला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री भूपेश बाघेल आणि इतर काँग्रेस नेतेही विजयासंबंधी निश्चिंत होते. तथापि, भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. ते इतके मोठे होते की राज्य स्थापन झाल्यापासून त्या वेळेपर्यंत तसे केव्हाही मिळाले नव्हते. तो निवडणुकीच्या इतिहासातील चमत्कारच मानला गेला होता. भारतीय जनता पक्षाला 90 पैकी 55 जागा आणि जवळपास 46 टक्के मते मिळाली होती.

पुनरावृत्ती घडण्याची शक्यता...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष याच यशाची पुनरावृत्ती करण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे, असे बव्हंशी विश्लेषकांचे मत आहे. येथेही या पक्षाला मोठे आव्हान नाही. विरोधी पक्ष काँग्रेस सोडून दुसरा कोणी नाही. सर्व मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच सरळ लढत आहे. मध्यप्रदेशप्रमाणेच काही ठिकाणी बहुजन समाज पक्षाची मते आहेत. पण या पक्षाचे अस्तित्व मर्यादित आहे. विधानसभेतील अनपेक्षित पराभवानंतर काँग्रेसला बसलेल्या धक्क्यातून तो पक्ष सावरलेला दिसत नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनीही या राज्याकडे प्रचाराच्या दृष्टीने दुर्लक्षच केलेले दिसून येते. त्यामुळे चमत्कार घडला नाही, तर भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित मानला गेलेला आहे. बस्तरच्या वनवासी भागांमध्ये काँग्रेसला काही आशा असल्याचे बोलले जाते. तथापि, तेथेही या पक्षाचे कार्यकर्ते उदासिन असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.