छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गोवा विजयी
वृत्तसंस्था/ झांशी (उत्तरप्रदेश)
हॉकी इंडियातर्फे येथे सुरु असलेल्या 15 व्या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत छत्तीसगड, हिमाचलप्रदेश, चंदीगड आणि गोवा या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदविले. या संघांचा सदर स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.
या स्पर्धेतील झालेल्या क गटातील पहिल्या सामन्यात राजस्थानने जम्मू काश्मिरचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला. राजस्थानतर्फे विशाल कुमारने 2 गोल तर पुलकित केसरी, विक्रमसिंग राठोड, अनुराग यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. राजस्थानतर्फे विष्णू शर्माने 2 गोल तसेच जगमित सिंग आणि सुस्मित सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. क गटातील दुसऱ्या एका सामन्यात अरुणाचल प्रदेशने त्रिपुराचा 20 गोलांनी दणदणीत पराभव केला. अरुणाचल प्रदेशतर्फे ब्रिजेश यादवने 4 गोल तर अभिनव सिंगने 6 गोल नोंदविले. जयप्रकाश पटेलने 3 गोल केले. त्याचप्रमाणे शहबाज खानने 3 गोल आणि निरजने 2 गोल, विशाल कुमार, कर्णधार प्रांजल मिश्रा यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला.
क गटातील अन्य एका सामन्यात छत्तीसगडने बिहारचा 15-0 असा फडशा पाडला. छत्तीसगडतर्फे अर्जुन यादव, के. बोपन्ना, कार्तिक यादव, शैलेंद्र वर्मा, सोनू निशाद यांनी प्रत्येकी 2 गोल तर आनंदराज, आदित्य मेशराम आणि विष्णू यादव यांनी प्रत्येकी 1 गोल केला. छत्तीसगडचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. क गटातील अन्य एका सामन्यात हिमाचल प्रदेशने गुजरातचे आव्हान 17-1 असे संपुष्टात आणले. हिमाचल प्रदेशतर्फे हर्षने तसेच रजत शर्माने प्रत्येकी 5 गोल, अमित कुमारने 3 गोल, आयुषने 2 गोल तर सतविंदर सिंग आणि कपिल यांनी प्रत्येकी 1 गोल केला. चंदीगडने ब गटातील सामन्यात तेलंगणाचा 2-1 असा निसटता पराभव केला. चंदीगडतर्फे मोहित आणि दिलीप पाल यांनी प्रत्येकी 1 गोल तर तेलंगणातर्फे वेंकटेशने 1 गोल केला. गोवा संघाने आंध्र प्रदेशचा 5-1 असा पराभव केला. गोवा संघातर्फे त्रिशुल गणपती, अयाज खान, महादेव नाईक, साहिल चारी आणि सय्यद यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. आंध्र प्रदेशतर्फे गोपालने एकमेव गोल केला.