For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भामरागडमध्ये पुराचा कहर कायम; तिसऱ्या दिवशीही 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला

02:36 PM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भामरागडमध्ये पुराचा कहर कायम  तिसऱ्या दिवशीही 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला
Advertisement

भामरागड | प्रतिनिधी : छत्तीसगड राज्यातील पूरस्थितीचा फटका सीमावर्ती भागालाही बसला असून, भामरागड तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे. पूर ओसरण्याचा वेग अत्यंत कमी असल्याने तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क अद्याप तुटलेलाच आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

Advertisement

मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक रस्ते आणि मार्ग पाण्याखाली गेले आहेत. परिणामी भामरागड तालुक्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दोन राष्ट्रीय महामार्गांसह चार प्रमुख मार्ग बंद असल्याने भामरागडचा इतर भागांशी संपर्क साधण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पूरपाणी ओसरत असले तरी त्याचा वेग अत्यंत कमी असल्याने परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आज दिवसभरही अनेक गावांतील नागरिकांचा बाहेरील भागाशी संपर्क होऊ शकला नाही. रस्ते आणि पुलांवर पाणी असल्याने वाहतूक सुरू करण्यासही अडथळे निर्माण होत आहेत.

Advertisement

दरम्यान, प्रशासनाकडून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून संपर्क तुटलेल्या गावांमधील परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पूरपाणी पूर्णपणे ओसरल्यानंतरच बंद मार्गांवरील वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.