छत्रपतींचे किल्ले ‘जागतिक वारसास्थळां’मध्ये होणार सामील; पन्हाळा, सिंधुदुर्ग, रायगडची शिफारस
केंद्र सरकारकडून यादी तयार :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024-25 च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीसाठी भारत सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या किल्ल्यांच्या नावाची शिफारस करणार आहे. यात महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला, शिवनेरी, लोहगड, खंडेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला सामील आहे. जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाल्यास या किल्ल्यांचे तसेच दुर्गांचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. या किल्ल्यांच्या जतनाकरता वाढीव निधी मिळावा ही मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे.
हे सर्व किल्ले आणि दुर्ग मराठा साम्राज्यात निर्माण करण्यात आले असून ते विविध प्रकारच्या भौगोलिक ठिकाणी आहेत. हे किल्ले एकप्रकारे त्या काळातील मराठा साम्राज्यातील सैन्यसामर्थ्य दर्शवितात. याचमुळे भारत सरकार यावेळी जागतिक वारसास्थळांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यासाठी ‘मराठा मिलिट्री लँडस्केप्स ऑफ इंडिया’ची शिफारस करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज तसेच पुढील छत्रपतींनी किल्ल्यांचे एक पूर्ण जाळे तयार केले होते. सह्याद्री तसेच अन्य पर्वतरांगांमध्ये, समुद्रात, समुद्रकिनारी या किल्ले तसेच दुर्गांची निर्मिती करण्यात आली होती. दख्खनच्या पठारापासून पश्चिम घाटापर्यंत एकूण 390 किल्ले आहेत. परंतु मराठा मिलिट्री लँडस्केप अंतर्गत केवळ 12 किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.
या 12 पैकी 8 किल्ल्यांचे जतन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग करत आहे. शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जिंजी किल्ला यांचा यात समावेश आहे. तर साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगडचे संरक्षण महाराष्ट्र सरकारचे डायरेक्टोरेट ऑफ आर्कियोलॉजी अँड म्युझियमकडून केले जात आहे.
राजगड आणि जिंजी हे किल्ले पर्वतांवर निर्माण करण्यात आले आहेत. तर प्रतागड हा जंगलाने वेढलेल्या पर्वतावर बांधण्यात आला होता. पन्हाळा हा पठारी पर्वतावर तयार करण्यात आलेला किल्ला आहे. विजयदुर्ग हा किनारी दुर्ग आहे. तर खंडेरी, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे समुद्रातील बेटांवर तयार करण्यात आलेले दुर्ग आहेत.