दिव्यांच्या प्रकाशाने उजळला छत्रपती शिवाजी उद्यान परिसर
बेळगाव : दिवाळीनिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे पहिला दिवा महाराजांच्या चरणी हा उपक्रम राबविण्यात आला. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभ्यंगस्नान घालून मूर्तीच्या सभोवती दिवे प्रज्वलित करण्यात आले. त्यामुळे शिवाजी उद्यान परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. प्रारंभी काकडारती व भजन, कीर्तन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी हभप महादेव पाटील यांचे कीर्तन झाले. त्याचबरोबर कंग्राळी, अनगोळ, खासबाग येथील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते. धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे शंभूतीर्थ परिसरातही दीपोत्सव करण्यात आला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व कंग्राळ गल्ली विभागाच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.