शौर्य, साहस, पराक्रमाचे मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवराय!
रोटरी आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची यशस्वी सांगता : अप्रतिम-दर्जेदार रांगोळ्यांचेही आकर्षण
वंशजांकडून रोटरी क्लबची प्रशंसा
शुक्रवारी या प्रदर्शनाला तानाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज डॉ. शीतल शिवराज मालुसरे, हिंदुराव घोरपडे यांचे अकरावे वंशज यशराज घोरपडे, बाजीप्रभू देशपांडे यांचे अकरावे वंशज संदेश जी. देशपांडे, कमळोजी साळुंखे यांचे चौदावे वंशज सुहास साळुंखे यांनी भेट दिली. प्रदर्शनाचे नेटके आयोजन व विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांनी रोटरी क्लबची प्रशंसा केली.
मावळ्यांकडे शंभर हत्तींचे बळ
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना शंभर हत्तींचे बळ असलेले मावळे तयार केले. सेनापती येसाजी कंक यांनी तर एका हत्तीची सोंड धडावेगळी करत शिवरायांच्या मावळ्याचे शौर्य गोवळकोंडाच्या किल्ल्यात दाखवून दिले. बाजीप्रभू देशपांडे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासारख्या पराक्रमी सरदारांनी शिवाजी महाराजांसाठी जीवाची बाजी लावली. हे मावळे होते म्हणूनच स्वराज्याचे स्वप्न साकार झाले, असे विचार कोल्हापूर येथील शिवव्याख्याते अमर अडके यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब बेळगाव साउथवतीने आयोजित शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लब बेळगाव साउथचे अध्यक्ष निलेश पाटील, सेक्रेटरी भूषण मोहिरे, इव्हेंट चेअरमन अशोक नाईक उपस्थित होते. शिवकालीन शस्त्र हा आपल्यासाठी ऐतिहासिक ठेवा आहे. शस्त्र तसेच तानाजी मालुसरे यांची कवड्यांची माळ पाहिल्यानंतर शिवरायांचे शौर्य अनुभवता येते. आपला देदीप्यमान इतिहास समजून घ्यायचा असेल तसेच पुढच्या पिढीला तो समजावा असं वाटत असेल तर अशी शस्त्र प्रदर्शने पाहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
चिमुकल्याच्या पोवाड्याला उत्स्फूर्त दाद
शस्त्र प्रदर्शनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. शार्दुल केसरकर या चिमुकल्याने प्रतापगडच्या रणसंग्रामावर आधारित पोवाडा सादर केला. अतिशय सुंदररित्या सादर केलेल्या या पोवाड्याला शिवप्रेमींनी दाद तर दिलीच त्याचबरोबर प्रमुख पाहुणे अमर अडके यांनीही शार्दुलचे कौतुक केले. यानंतर महिलांनी झिम्मा-फुगडी सादर केली. रात्री येळ्ळूर येथील ढोल-ताशा पथकाने अप्रतिम असे वादन केले.