For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छ. शिवाजी महाराज परिक्रमा रेल्वे 9 ते 14 जूनपर्यंत

04:55 PM May 21, 2025 IST | Radhika Patil
छ  शिवाजी महाराज परिक्रमा रेल्वे 9 ते 14 जूनपर्यंत
Advertisement

सातारा :

Advertisement

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने भारत सरकारच्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन कार्पोरेशन व भारत गौरव टुरिस्ट ट्रेनव्दारे 9 ते 14 जूनच्या पहाटेपर्यंत पाच दिवसांचा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट (परिक्रमा) पर्यटन व ऐतिहासिक ज्ञान ग्रहण उपक्रम सुरु होत आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त व्यक्तींनी लाभ घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन नवीन उर्जा प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासामधून युवापिढीला प्रेरणा मिळावी, या एकमेव उद्देशाने बुध्द सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किट, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई आणि दिल्ली येथे भव्य स्मारक, शासनमान्य इतिहास प्रसिध्द करणे, बदनामी प्रतिबंधक कठोर कायदा करणे याबाबत आमचा पाठपुरावा सुरु आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर शिवप्रभुंच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या ठिकाणांना विशेष रेल्वेने भेट देण्याचा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा उपक्रम भारत सरकारच्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन कार्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीमार्फत सुरु होत आहे. भारत गौरव ट्रेनद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून स्वराज्याचे उदिष्ट साध्य होईपर्यंतच्या जीवनकार्यात रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील ज्या ठिकाणी ऐतिहासिक अतिमहत्वाच्या घटना घडल्या, त्या ठिकाणांना भेटी देता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजरामर इतिहास साक्षात पाहता, अनुभवता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई येथुन 9 जून रोजी सकाळी 6.30 वाजता सुटणारी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन दादर-मुंबई आणि ठाणे या ठिकाणी थांबून कोकण रेल्वेने माणगाव व तेथून किल्ले रायगड दर्शन झाल्यावर पुणे येथे पहिल्या दिवसाचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर 10 जून रोजी लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी पाहिल्यावर दुसरा मुक्काम पुणे येथेच असणार आहे. 11 जून रोजी किल्ले शिवनेरी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योर्तिलिंग दर्शन व तिसरा मुक्काम पुण्यात असणार आहे. 12 रोजी सातारा येथे गौरव ट्रेन येणार असून, किल्ले प्रतापगड दर्शन केल्यावर शाहु महाराज टर्मिनल्स कोल्हापूरकडे भारत गौरव ट्रेन प्रयाण करणार आहे. चौथ्या दिवसाचा मुक्काम कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवासात असणार आहे. 13 रोजी श्री महालक्ष्मी मंदिर दर्शन आणि किल्ले पन्हाळा दर्शन करुन रात्री 8 वाजता सदरची ट्रेन मुंबईकडे परतणार आहे. पाचवा मुक्काम कोल्हापूर ते मुंबई या रेल्वे प्रवासातच असेल. 14 रोजी पहाटे 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन परतणार आहे. येता-जाता दादर आणि ठाणे याठिकाणी प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश किंवा उतरणे शक्य असणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच भारत गौरव टुरिस्ट ट्रेन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज परिक्रमा करण्यासाठी धावणार आहे. ट्रेनमध्ये इकॉनॉमी (स्लीपर), आरामदायी (3 एसी) आणि सुपीरिअर (श्रेष्ठ) असे प्रवासाचे तीन प्रकार असून, प्रतिमाणशी अनुक्रमे 13,155, 19840 आणि 27,365 असे तिकिटांचे दर आहेत. या खर्चात मुक्काम, गाडीमधील किंवा गाडीबाहेरील शाकाहारी जेवण, नाष्टा, ऐतिहासिक ठिकाण भेटीचा प्रवास, प्रवेश फी, रोप वे चार्जेस, ट्रेनची सुरक्षा, प्रवाशांचा प्रवासी विमा, सर्व प्रकारचे लागू असलेले कर, यांचा समावेश आहे. भारत सरकारच्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन कार्पोरेशनच्या माध्यमातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच सुरु होत आहे.

छत्रपतींचे वास्तव जीवन कार्य चरित्र आणि छत्रपतींचा अलौकिक वारसा, पर्यटनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहण्याची व अनुभवण्याची संधी या टुरिस्ट ट्रेन परिक्रमेमुळे नागरिकांना मिळणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज (सर्किट) परिक्रमेच्या भारत गौरव ट्रेनला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :

.