छत्रपती शाहू महाराज जयंती सरकारी स्तरावर साजरी करावी
चलवादी महासभेची मागणी : मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन
बेळगाव : सामाजिक न्याय, समता व शिक्षणाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या विकासासाठी मोलाचे कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे महान शिल्पकार होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारी पातळीवर छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी. तसेच बेळगाव महापालिकेने मंजूर केलेला छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा, अशी मागणी चलवादी महासभेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले. महात्मा जोतिबा फुले यांचे विचार अंगिकारून छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला नवी दिशा दिली. अस्पृश्य, मागासवर्गीय व वंचित समाजघटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजने 10 जून 1902 रोजी त्यांना एलएलडी ही मानद पदवी प्रदान केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्यास आर्थिक मदत करून छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अविट ठसा उमटविला. मागासवर्गीय, शोषित व वंचित समाजासाठी ते आशेचा दीपस्तंभ ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती राज्यभरात सरकारी स्तरावर साजरी करावी. तसेच बेळगाव महापालिकेने मंजूर केलेला छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा केएलई हॉस्पिटलनजीक राष्ट्रीय महामार्गालगत लवकरात लवकर उभारावा, अशीही मागणी करण्यात आली.