Cultural Kolhapur: शाहू महाराजांची दूरदृष्टी अन् औद्योगिक प्रदर्शनांनी कोल्हापूरला बनवले उद्यमनगरी
विविध उत्पादने बनवणाऱ्या कारागीर आणि उद्योजकांना प्रोत्साहन दिले
By : मानसिंगराव कुमठेकर
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला आज उद्यमनगरीचा जो दर्जा मिळाला आहे, त्यामागे राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. त्यांनी सातत्याने आपल्या कारकिर्दीमध्ये कला कौशल्याची प्रदर्शने भरवली. त्यातून वेगवेगळी उत्पादने बनवणाऱ्या कारागीर आणि उद्योजकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आज कोल्हापूरमध्ये वेगवेगळे उद्योग उभारले आहेत.
राजर्षी शाहू महाराजांच्या काळात त्यांनी अनेक कलाकारांना प्रोत्साहन दिले. संगीत, नाटक, क्रीडा या क्षेत्राबरोबरच कला कौशल्याची कामे करणाऱ्या कारागिरांनाही त्यांनी प्रोत्साहन देत त्यांच्या कलाकौशल्याला वाव दिला. त्यातूनच मोठमोठे उद्योजक कारागीर तयार झाले. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी व जनावरांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले.
कारागिरांना उत्तेजन देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कारागिरांना उत्तेजन देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सातत्याने कला कौशल्याची प्रदर्शने भरवली. त्यामध्ये करवीर संस्थानातील वेगवेगळ्या गावातील कारागिरांना एकत्र करून त्यांच्या उत्पादनांना लोकांसमोर आणले. त्यामुळेच या कारागिरांनी अनेक उत्पादने बनवली, ती देशभर प्रसिद्ध झाली.
राजर्षी शाहू महाराजांनी 1888 ते 1900 दरम्यान भरवलेल्या विविध प्रदर्शनाचे अहवाल आणि त्यावेळीची माहिती पत्रके मिरज येथे संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत. सन 1888 साली करवीर संस्थानातील कला कौशल्याची कामे करणाऱ्या कारागिरांसाठी पहिले प्रदर्शन भरविले गेले.
त्या प्रदर्शनाची माहिती पत्रके उपलब्ध आहेत या प्रदर्शनाचा हेतू सांगताना त्यामध्ये म्हटले आहे की, ‘अशी प्रदर्शने वेळोवेळी होऊ लागून त्यात येणारा माल कोण कोणते ठिकाणी तयार होतो, याची महिती लोकास समजून या मालाचा खप होऊन उत्तेजन मिळू लागेल.
कला कौशल्याचे कामासंबंधी हे पहिलेच प्रदर्शन असल्याने अशा प्रदर्शनातून कारागीर लोकांस पुढे किती फायदा होणार आहे, हे त्यास तूर्त समजण्यासारखे नाही. पहिल्या प्रदर्शनात 15 विभाग सन 1888 मध्ये करवीर संस्थानात भरलेल्या या पहिल्या प्रदर्शनात एकूण 15 विभागात वेगवेगळ्या वस्तू कारागिरांकडून मागविण्यात आल्या.
त्यामध्ये दगडी वस्तू, कुंभार कामाच्या वस्तू, सुतारकाम, यांत्रिक वस्तू, तांबे, पितळ, लोखंडाची भांडी व वस्तू, कापड व त्यासंबंधी उत्पादने, सुवर्ण कारागिरी, चित्रकला, संगीत वाद्ये, कृषि विषयक यंत्रसामुग्री, निरनिराळी वाहने असे विभाग होते.
शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने घडली उद्यमनगरी
कला कौशल्याच्या या पहिल्याच प्रदर्शनाला कारागिरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. करवीर संस्थानच्या विविध गावातून मोठ्या संख्येने कारागीर या प्रदर्शनात सहभागी झाले. या प्रदर्शनातून त्यांची उत्पादने थेट लोकांपर्यंत पोहचल्याने त्यांना फायदा झाला.
त्यामुळे करवीर संस्थानात पुढेही काही वर्षे ही कला कौशल्याची प्रदर्शने भरलेली दिसतात. त्यातूनच करवीरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळविणारे कारागीर आणि उद्योजक तयार झाले आणि कोल्हापूर देशातील महत्वाची उद्यमनगरी बनली. यामागे राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून त्या काळात भरविलेलीऔद्योगिक प्रदर्शनाचा मोठा वाटा आहे.