त्या गोष्टीचा मला पश्चात्ताप.... भुजबळांची सरकारने तात्काळ हकालपट्टी करावी- संभाजीराजे
छगन भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे वारस आहेत असे मला वाटतं होते पण ते आता मला त्याचा पश्चात्ताप होत आहे. छगन भुजबळ हे जाती जातीमध्ये भांडण लावत असून सामाजिक समतोल बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची परखड टीका स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या वर केली आहे.
मनोज जरांगे- पाटील यांची आपल्या महाराष्ट्र दौ-यामध्ये आज कोल्हापूरातील दसरा चौकात जाहिर सभा झाली. या सभेनंतर त्यांनी छगन भुजबळ यांनी आज अंबड येथील सभेत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
ते म्हणाले, "छगन भुजबळ नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालतात असे भासवतात. आजच्या त्यांच्या अंबड येथील सभेमध्ये मराठा आणि ओबीसी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जे शक्य होतं ते त्यांनी केलं. दोन जातीबद्दल समतोल बिघडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यामुळे मी त्यांची हकालपट्टी व्हावी असे ट्विट केले. "
पुढे बोलताना ते म्हणाले, "मी काही काही वर्षांपूर्वी त्यांच्या नाशिक मधील घरी गेलो होतो. त्यावेळी ते अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून शाहू महाराजांच्या विचारांचे वारस आहेत असे मी म्हणालो होतो मात्र याचा आता मला पश्चात्ताप होत आहे. आज त्यांचे विचार ऐकल्यावर ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावावे असे त्यांचे शब्द होते. यामुळे मला सरकारला आव्हान आहे, सरकारने स्पष्ट सांगावं की आम्ही भुजबळांचे समर्थन करत नाही. आणि समर्थन करत नसाल तर सरकारने त्यांची हकालपट्टी करावी." असे आवाहन त्यांनी सरकार ला केले.