मित्र पक्षाच्या नेत्याकडूनच राष्ट्रवादीचा गेम? मराठवाडा पदवीधरमध्ये डाव उलटला; महायुतीत संघर्ष पेटणार?
मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीतील तात्पुरत्या आकडेवारीनुसार, डॉ. प्रतापसिंह पाटील यांना 78,540 मते मिळाली, तर सतीश चव्हाण यांना 55,180 मते मिळाली. या टप्प्यावर पाटील यांनी 23,360 मतांची आघाडी घेतली होती. रविराज साबळे यांना 20,470, तर दिलीप घुगे यांना 8,376 मते मिळाल्याचे सांगण्यात आले. ही आकडेवारी तात्पुरती असल्याने अधिकृत निकालानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
दुसऱ्या फेरीतही प्रतापसिंह पाटील आघाडीवर
दुसऱ्या फेरीच्या आकडेवारीनुसार, डॉ. प्रतापसिंह पाटील यांना 54,095 मते मिळाली होती. सतीश चव्हाण यांना 43,161, रविराज साबळे यांना 14,598, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांना 6,218 मते मिळाली होती. या फेरीअखेर पाटील यांची आघाडी 10,934 मतांची होती.
दुसऱ्या फेरीपर्यंत एकूण 1,40,543 मतांची मोजणी झाल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी 11,783 मते बाद ठरल्याने वैध मतांच्या संख्येवर आणि विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या कोट्यावर परिणाम झाला आहे.
सत्तारांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील लढत महत्त्वाची ठरली आहे. अजित पवार गटाचे सतीश चव्हाण आणि शरदचंद्र पवार गटाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात थेट चुरस पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेतील मराठवाड्यातील प्रमुख नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला होता. चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्तार यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. एवढेच नव्हे, तर त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारमंचावर उपस्थित राहून प्रचारात सहभाग घेतल्याचीही चर्चा होती. स्थानिक राजकीय समीकरणे आणि अंतर्गत मतभेदांमुळे सत्तार यांनी चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या भूमिकेचा मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राजकीय गणितावर किती परिणाम झाला, याची चर्चा आता सुरू आहे.
दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकालाचे गणित
पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी पसंतीक्रमानुसार होत असल्याने कोणत्याही उमेदवाराला आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता न आल्यास बाद उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. त्यामुळे सध्याची आघाडी असूनही अंतिम निकालासाठी पुढील फेऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.
उपलब्ध आकडेवारीनुसार, प्रतापसिंह पाटील यांची आघाडी भक्कम आहे. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांचे वितरण आणि आवश्यक कोटा पूर्ण होतो का, यावर विजयाचा निर्णय अवलंबून असेल.
अंतिम निकालाबाबत उत्सुकता
मतमोजणीला 24 तासांहून अधिक काळ झाल्यानंतरही प्रक्रिया सुरू असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांची उत्सुकता वाढली आहे. तिसऱ्या फेरीतील तात्पुरत्या आकडेवारीत प्रतापसिंह पाटील यांनी मोठी आघाडी घेतली असली, तरी अंतिम निकाल अधिकृत घोषणेनंतरच निश्चित होईल.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात कोण विजय मिळवणार आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे निकालात काही बदल होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
