नर्सरी बागेत शाही शिवजयंती उत्साहात
छत्रपती घराण्याच्या वतीने शाही लवाजम्यासह पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी
कोल्हापूर
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती राज्यभरात साजरी केली जात आहे. छत्रपती घराण्याच्या वतीने देखील कोल्हापुरात पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. करवीर संस्थानच्या वतीने पारंपरिक रितिरिवाजात आज शिव जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला.
ऐतिहासिक भवानी मंडप येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची पालखीतून पारंपरिक लवाजम्यात नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. या ठिकाणी छत्रपती घराण्याच्या प्रमुख मानकऱ्यांनी विधिवत पूजा करत शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते देखील पूजा पार पडली. यावेळी शाहिर आझाद नायकवडी यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थित रोमांचित झाले.
'आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे देशभरात सर्वांना मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व लोकांसह एकत्रित कार्य करत राहीलो, तर देशाची उन्नत्ती निश्चितच होते. एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्व नागरिक एकत्र येऊन कार्यरत होतात. आग्रातही शिवजयंती साजरी होती आहे, हे महत्त्वाचे आहे. तिथून त्यांनी स्वतःची सुटका करून घेत स्वराज्यात आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. आग्राहुन सुटका झाल्यानंतर ते स्वराज्यात कसे आले याबद्दल अजून संशोधन होण्याची गरज आहे. राहुल सोलापूरकर यांनी चुकीचेच वक्तव्य केलेले आहे. विकीपिडीया म्हणजे इतिहास नाही. चुकीची माहिती टाकून समाजाची दिशाभुल करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे विकीपीडीयाचा निषेधच केला पाहीजे. याशिवाय महाराष्ट्र शासना याविरोधात योग्य कारवाई करावी. सध्या राज्यसरकारने विकीपिडीयावरील मजकूराबाबत घेतलेला पवित्रा हा सौम्य आहे असे आम्हाला वाटते. राज्य सरकाने सर्व तपासणी निशी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात योग्य ती काळजी घ्यावी. भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घ्यावी'. असे वक्तव्य याप्रसंगी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केले.