Kolhapur : कोल्हापूरमध्ये छठपूजेची मंगल सांगता; श्रद्धाळूंनी केली पंचगंगा घाटाची स्वच्छता
कोल्हापूरात उत्तर भारतीय बांधवांचा छठपर्व सोहळा संपन्न
कोल्हापूर : राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्या माध्यमातून गेल्या सोमवारी पंचगंगा नदी घाटावर बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल व ओडीशा येथील लोकांनी सुरु केलेल्या छठपूजेची (सूर्यषष्टी व्रत) मंगळवारी सकाळी ७वाजता सांगता झाली. यानंतर सर्व या सर्वांनी एकत्र येऊन पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता केली.
स्वच्छता कामापूर्वी म्हणजेच पहाटे साडेपाच वाजल्यापासून उगवत्या सूर्यदेवाला सकालीन अर्घ्य देण्याच्या विधीला दीडशेहून अधिक महिला आणि पुरुषांनी आरंभ केला. दीड तासांच्या कालावधीत त्यांनी परंपरेनुसार पंचगंगा नदी पात्रातील पाण्यात उभे राहून सूर्यदेवाला सकालीन अर्घ्य देण्याच्या विधी केला. हा विधी करत असतानाही सर्वांनी आपल्या हातातील सुपामध्ये पणती, फुले, फळे, ठेकूवा पदार्थ हे ठेवलेले होते.
एकीकडे सूर्यदेवा अर्घ्य देण्याचा विधी सुरु असतानाच अन्य उत्तर भारतवासियांनी सूर्यदेवाची सामुहिकपणे आराधनाही केली. सकाळी ७ वाजता अर्घ्य विधी आणि आराधना थांबवून छठपूजेची सांगता केली. यानंतर राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्या वतीने छठपूजेच्या प्रसादाचे सर्वांना वाटप करण्यात आले. अन्य लोकांनीही आपल्या घरी बनवलेला स्वादिष्ट ठेकुवा हा पदार्थ आणि फळांचे वाटप केले.