छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
प्रतिनिधी/ मुंबई
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होत पक्षप्रमुख अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अखेर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तब्बल 40 मिनिटे त्यांनी चर्चा केली. त्यामुळे छगन भुजबळ भाजपकडे जाण्याचा मार्ग चोखाळणार असे संकेत मिळत आहेत.
या भेटीबाबत भुजबळ यांनी म्हटले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राजकीय आणि सामाजिक विषयावर चर्चा झाली. महायुतीला जे यश मिळाले आहे, त्यामध्ये ओबीसींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. या भेटीमध्ये फडणवीस यांनी भुजबळांना ‘वेट अँड वॉच’चा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. आठ, दहा दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
छगन भुजबळ म्हणाले, समीर भुजबळसह आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अनेक बाबींवर त्यांच्याशी चर्चा झाली. सामाजिक असो किंवा राजकीय मुद्यांवर आम्ही त्यांच्याशी बोललो. महायुतीच्या महाविजयात ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणात लाभले. त्यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊनच, ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही फडवीस यांनी दिल्याचे भुजबळ म्हणाले.
आपण भाजपसोबत जाणार का, असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी विचारताच ‘मला जे काही बोलायचे ते सर्व बोललो आहे. अधिक काही बोलणार नाही’, असे म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
भुजबळ ओबीसींचे देशभराचे नेते
छगन भुजबळ राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ओबीसी समाजासाठी काम करणारा नेता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने स्वभाविक ते नाराज होते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून त्यांनी ही भेट घेतली असावी. सगळ्यांशी समन्वय साधत सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा फडणवीस यांचा स्वभाव आहे. फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ही भेट झाली असावी असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.