छब्या, लेका तुच चुकलास..!
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
वडणगे येथे झालेल्या बैलगाडी शर्यतीतील छब्या बैलाचा मृत्यू झाला. डांबरी रस्त्यावर परवानगी नसताना घेतलेल्या या शर्यतीत धापाललेल्या बैलाने आपली असहाय्यता दाखवत जीव सोडला. त्याच्या नाकातून रक्त, तोंडातून फेस आणि वीतभर जीभ बाहेर आली होती. मालकाने त्याला जमिनीत पुरून अंत्यविधीही आटोपला. पण पुन्हा त्याच बैलाच्या वाट्याला ‘पोस्टमार्टम’ची वेळ आली. खड्ड्यातून बाहेर काढून पोस्टमार्टम करण्यासाठी पुन्हा त्याच्या शरीराची चिरफाड करावी लागली. छब्याच्या मृत्यूला आता विनापरवाना शर्यत घेणारे जबाबदार ठरतील की नाही, हा पुढचा मुद्दा आहे. पण ‘छब्या तूच चुकलास..’ असे म्हणून जबाबदारी छब्यावरच उलटवण्याचा डाव सुरू झाला आहे.
बैलगाडी शर्यत हा प्रत्येक गावाच्या जत्रेतला एक महत्त्वाचा भाग असतो. पंचक्रोशीतले शर्यत शौकीन ट्रिपल, चौपलसीट प्रवास करून शर्यत पाहायला येतात. वडापच्या गाड्या तर भरभरून शर्यतीच्या मैदानाजवळ उतरतात. अमुक बैल मैदान मारणार, तमुक बैल मैदान मारणार, यावर बीट लागते. बैलगाडीवाला तर शौकिनांच्या गराड्यातच असतो. साधारण नव्या नियमानुसार बैलगाडी शर्यत मातीच्याच रस्त्यावर आणि तीही खुद्द प्रांताधिकाऱ्यांच्याच परवानगीने घ्यावी लागते. तसेच शर्यतीचा रस्ता ज्याच्या मालकीचा आहे, त्याचीही परवानगी आवश्यक आहे.
रस्ता पीडब्ल्यूडीचा किंवा शर्यतीचा माळ ग्रामपंचायत, नगरपालिकेच्या मालकीचा असेल तर त्यांची परवानगीही आवश्यक असते. एवढेच नव्हे तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बैलांची आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते. शर्यतीच्या मार्गावर दोन्ही बाजूने बॅरीकेट लावण्याची सक्त अट घातलेली असते. बैलाला न मारण्याची ठळक अक्षरात सुचना असते. शर्यतीच्या मार्गात हौश्या-नवश्यांना मोटारसायकलच्या पुंगळ्dया काढून पळवण्याची मुभा अजिबात असते. जरूर शर्यतीच्या बैलावर बैलमालक प्रेम करतात. खर्च करतात. घरातल्या माणसाप्रमाणे जपतात. पण शर्यतीला मात्र ते नको तितक्या इर्षेची जोड देतात. आपल्या बैलाची जोडी पंचक्रोशीत गाजली पाहिजे, या इर्षेने पळवतात आणि तेथेच नको ते प्रसंग जुंपलेल्या त्या निष्पाप बैलाच्या वाट्याला येतात.
वडणगे येथील बैलगाडी शर्यत आयोजकावर यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. छब्या बैलाचा या शर्यतीत मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याचे पोस्टमार्टम केले गेले आहे. त्यासाठी पुरलेल्या छब्याला जमिनीतून बाहेर काढून पोस्टमार्टमची क्रिया झाली आहे. त्या अहवालावरून गुह्याची कलमे आणखी वाढणार आहेत.
बैलगाडी शर्यत ग्रामीण भागात लोकप्रिय आहे, हे खरे आहे. पण शर्यतीचे तंतोतंत नियम संयोजक पाळतात की नाही, हे पाहण्याची गरज आहे. कारण या शर्यतीला नको इतक्या इर्षेची अलीकडे जोड मिळाली आहे. बैलांना वेगळा खुराक देऊन पोसले जात आहे. तयार बैलाची किंमत तर लाखांच्या पटीत आहे. आणि असे ‘लाख’मोलाचे बैल घेणारे शौकिनही आहेत. पण बैलगाडी शर्यत विश्वात ‘चहापेक्षा किटली गरम’ असे अनेक जण आहेत. बैलाला आम्ही असे पोसतो, तसे पोसतो, हे सांगताना ते आपल्या मनात दडलेली इर्षा बैलावर लादत आहेत. किती लाखाचा बैल कोणाकडे आहे, यावरून स्टेटस ठरवले जात आहेत.
शर्यतीत हे नामांकित बैल असले तरच शौकिनांचा धुरळा उडतो, अशी संयोजकांची मानसिकता आहे आणि त्यातून ‘जिंकण्यासाठी काय पण’ ही भावनाच वाढीस लागली आहे. मोबाईलवर आव्हान, प्रति आव्हान दिले जात आहे. त्यातून आणखी इर्षा आहे. पण अशाच इर्षेत छब्या बैलाने वडणगे शर्यतीत आपला जीव टाचा घासत सोडला आहे. बैलगाडी चालक-मालक, पोलीस, जिल्हा प्रशासन, पशुवैद्यकीय विभाग अशा सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज आहे. डांबरी रस्त्यावरून सिमेंटच्या रस्त्यावरून आपला बैल फूटभरही पळणार नाही, अशी भूमिका बैलगाडीच्या मालकांनी घेण्याची गरज आहे नाही तर छब्यासारखे निष्पाप त्यात बळी जाणार आहेत.