चेतेश्वर पुजाराची अनुपस्थिती समाधानाची बाब : हॅझलवूड
वृत्तसंस्था/पर्थ
आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेसाठी फलंदाज चेतेश्वर पुजाराची भारतीय संघात अनुपस्थिती ही समाधानाची बाब आहे, असे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूडने म्हटले आहे. आयसीसीने आयोजित केलेल्या तिसऱ्या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी भारताला ही मालिका 4-0 अशा फरकाने जिंकणे गरजेचे आहे. पर्थमध्ये 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होत आहे. 2014 मध्ये प्रथमच चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिली बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळत टीम इंडियाला मालिका जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाला बराच वेळ क्रीजला चिकटून फलंदाजी करावी लागते. चेतेश्वर पुजाराने अशी कामगिरी अनेकदा केली आहे. पण यावेळी तो संघात नसल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. कारण या मालिकेत भारतीय संघात अनुभवी खेळाडूंपेक्षा युवा खेळाडूंची संख्या अधिक आहे, असे हॅजलवूडने सांगितले. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियात दणदणीत प्रदर्शन केले असून त्याने 11 सामन्यांत 5 अर्धशतके आणि 3 शतकांच्या मदतीने 47.28 च्या सरासरीने 993 धावा केल्या आहेत.