चेतेश्वर पुजारा आता समालोचकाच्या भूमिकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा मध्यफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत समालोचनाचे काम करताना दिसणार आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून मागील दोन मालिकांत भारताने विजय मिळविला होता. या दोन्ही मालिकाविजयात पुजाराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या कामगिरीच्या आधारे त्याला यावेळीही संघात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण खेळाडू म्हणून नव्हे तर समालोचक या नव्या भूमिकेत तो या मालिकेवेळी दिसणार आहे. स्टार स्पोर्ट्स हिंदी वाहिनीवर तो समालोचन करणार आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकांत पुजाराने भारतीय फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ बनला होता. खेळपट्टीवर दीर्घकाळ ठाण मांडून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दमछाक करीत असे. ऑस्ट्रेलियाच्या जलद गोलंदाजांसमोर यावेळी त्याची उणीव संघाला निश्चितच जाणवू शकेल. या मालिकेतील पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होत आहे.