विनयभंग प्रकरणी चेतन घाटगे बडतर्फ
कोल्हापूर :
जबाब घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबीत पोलीस कर्मचाऱ्यास गुरुवारी पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. तर तीन लग्न केल्याची तक्रार पत्नीने दिल्याने शिरोळ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक इम्रान मुल्ला आणि दोन लग्न केल्याने चंदगड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक राजाराम पावसकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. याचसोबत कामात हलगर्जीपण केल्याबद्दल मुख्यालयातील एका सहायक फौजदारासह दोन कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस मुख्यालयातील नेमणूकीस असणारे सहायक फौजदार कृष्णात ठाणेकर, कॉन्स्टेबल प्रेमसागर मधाळे आणि प्रकाश पाटील यांची ड्युटी जिल्हा न्याय संकुलाजवळ न्यायाधीश निवासस्थानी बंदोबस्ताची होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानकपणे केलेल्या तपासणीमध्ये हे तिघेही गैरहजर असल्याचे समोर आले होते. याबाबत अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करुन पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडे पाठविला होता. यानंतर या तीघांचीही चौकशी करण्यात आली. प्रथमदर्शनी चौकशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणी अहवालामध्ये या तीघांनीही कर्तव्यात कसुरी केल्याचे निष्पण्ण झाले. यानंतर या तिघांनाही निलंबीत करण्यात आले. कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
- चेतन घाटगे बडतर्फ
दवाखान्याच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने जखमी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी चेतन दिलीप घाटगे याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. गुरुवारी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी ही कारवाई केली. चेतन घाटगे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून त्याला अटक करण्यात आली होती. तसेच त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली होती.
- तीन लग्नं करणे पडले महागात
पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांचा आफरीन मुल्ला यांच्याशी 2019 च्या दरम्यान विवाह झाला होता. यावेळी इम्रान मुल्ला हा गोंदिया येथे सेवा बजावत असताना तक्रारदार अफ्रीन मुल्ला यांच्यासोबत सातत्याने वाद होत होते. शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने आफरीन मुल्ला यांनी गोंदियातील केशारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान पत्नी आफरीन मुल्ला यांनी पाठपुरावा केल्यानंतर 2015 साली पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला याचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. मात्र कायदेशीर रित्या घटस्फोट न झाल्याची माहिती न देता इम्रान मुल्ला यांनी आफरीन मुल्ला यांच्याशी विवाह केल्याचे समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक मुल्ला याने इतक्यावरच न थांबता 23 जून 2024 रोजी तिसरे लग्न केल्याची माहिती आफरीन मुल्ला यांना मिळाली. आपल्यासोबत कायदेशीर रित्या तलाक न झाल्याने त्यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कोणतेही कारवाई होत नसल्याने अखेर माहिती अधिकारात यांनी पोलीस प्रशासनाशी पाठपुरावा केला. यानंतर इम्रान मुल्ला यांच्याकडे चौकशी केली असता, सुहाना कुमार याच्याशी माझं लग्न झालेलं नाही ती माझी मैत्रीण आहे. असा खुलासा त्यांनी केला होता. तर आफरीन मुल्ला हीच आपली पहिली पत्नी असल्याचं स्पष्टीकरण दिले होतं.
- दुसऱ्या लग्नामुळे निलंबन
पोलीस नाईक राजाराम पावसकर हे चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी दोन लग्न केल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर या तक्रारीची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.