For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छातीत दुखतयं... वेळ घालवू नका ! हृदयाचा इशारा ओळखा

04:18 PM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
छातीत दुखतयं    वेळ घालवू नका   हृदयाचा इशारा ओळखा
Advertisement

इम्रान गवंडी
कोल्हापूर: बदलती धावपळीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढता ताण-तणाव, अयोग्य आहार, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह व वाढलेले कोलेस्ट्रॉल यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अनेकदा हृदयविकाराची लक्षणे सौम्य असतात किंवा सुरुवातीला जाणवतही नाहीत. त्यामुळे छातीत दडपण किंवा दुखणे, श्वास घेण्यास त्रास, अचानक घाम फुटणे, मळमळ, चक्कर येणे अथवा हात, खांदा, जबडा किंवा पाठीकडे वेदना जाणवणे याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे असल्याचे हृदयविकार तज्ज्ञ सांगतात.

Advertisement

२९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयविकार व त्याच्या जोखीम घटकांबाबत जनजागृती करण्यासह निरोगी आहार, शारीरिक हालचाल व तंबाखूमुक्त जीवनशैलीचा संदेश या दिवशी दिला जातो. डब्लूएचओच्या निकषानुसार अस्वास्थ्यकर आहार, शारीरिक निष्क्रियता व तंबाखूचे सेवन हे हृदयविकाराच्या जोखमीतील प्रमुख बदलता येणारे घटक आहेत. दीर्घकाळचा ताण, कौटुंबिक इतिहास हे हृदयरोगाचे महत्त्वाचे जोखीम घटक असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे योग्य जीवनशैलीचा आवलंबच हृदयाला निरोगी ठेऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

आहाराची पद्धत बदला
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात भाज्या, फळे, कडधान्ये, तंतुमय पदार्थ वाढवावेत, मीठ, साखर, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि संतृप्त व ट्रान्स फॅटचे प्रमाण कमी करावे. दररोजच्या जीवनात चालणे, सायकलिंग, पोहणे, योगासने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य व्यायामाचा समावेश करावा यामुळे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबासह अनेक असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो.
डॉ. अक्षय बाफना, हृदरोग विभाग प्रमुख, सीपीआर,

Advertisement
Advertisement
Tags :

.