बुद्धिबळपटू वरुगीस कोशी कालवश
चेन्नई : भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मास्टर तसेच प्रख्यात बुद्धिबळ प्रशिक्षक व अनेक बुद्धिबळपटूंना मेंटर या नात्याने मार्गदर्शन करणाऱ्या वरुगीस कोशी यांचे वयाच्या 66 व्या वर्षी कर्करोगाने निधन जाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. वरुगीस कोशी गेली 10 महिने कर्करोगाशी सामना करत होते. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसाला कर्करोगाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. वैद्यकीय उपचार चालू होते पण अखेर कर्करोगाने त्यांच्यावर मात केली. भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील वरुगीस कोशी ही व्यक्ती सभ्य बुद्धिबळपटू म्हणून ओळखली गेली. 90 च्या दशकामध्ये वरुगीस कोशी यांनी राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केल्याने ते भारताचे दुसऱ्या क्रमाकांचे बुद्धिबळपटू म्हणून ओळखले जाऊ लागले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. वरुगीस कोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा बुद्धिबळपटू हरिकृष्णाने अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. नेदरलँड्समधील स्पर्धेत कोशी आणि हरिकृष्णा यांनी भाग घेतला होता.