बुद्धिबळ महासंघाकडून क्रॅमनिकवर निलंबनाची कारवाई
वृत्तसंस्था, बिलिंग्ज
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियामक संस्थेने (फिडे) माजी विश्वविजेता ब्लादिमीर क्रॅमनिकला किमान एका वर्षासाठी निलंबित केले आहे. त्याने गेल्या वर्षी वयाच्या 29 व्या वर्षी निधन झालेल्या डॅनियल नारोडित्स्कीसह इतर खेळाडूंवर फसवणुकीचे निराधार आरोप केले होते.
क्रॅमनिकने गेल्या वर्षी नारोडित्स्कीवर फसवणुकीचा आरोप केला होता आणि सोशल मीडियावरही संशय व्यक्त करणे सुरू ठेवले होते. शैक्षणिक यूट्यूब व्हिडीओ आणि लाईव्हस्ट्रीमद्वारे खेळाच्या ऑनलाईन प्रसाराला चालना देणारे एक प्रतिभावान बुद्धिबळपटू आणि अमेरिकन ग्रँडमास्टर असलेल्या नारोडित्स्कीने हे आरोप फेटाळून लावले होते. क्रॅमनिकने असोसिएटेड प्रेसला पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, तो शुक्रवारी या निलंबनाविरुद्ध अपील करणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की हा बेकायदेशीर निकाल अखेरीस रद्द केला जाईल आणि न्याय मिळवण्यासाठी व विशेषत: माझी प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी मी शेवटपर्यंत सर्व आवश्यक मार्गांचा अवलंब करणार आहे, असे क्रॅन्मिकने सोशल मीडीया पोस्टमध्ये म्हटले आहे.
बुद्धिबळ महासंघाने म्हटले आहे की, क्रॅमनिकने पुरेशा पुराव्याशिवाय सार्वजनिकरित्या फसवणुकीचे आरोप केले आणि सायबर गुंडगिरीविरोधी नियमांचे उल्लंघन केले. महासंघाने म्हटले आहे की, फसवणुकीचा सामना करणे हे त्यांच्या प्राधान्यांपैकी एक आहे. परंतु आरोपांवर त्यांच्या कार्यपद्धतीनुसार कारवाई केली पाहिजे आणि त्याला योग्य पुराव्यांचा आधार असला पाहिजे. त्याने ओळखता येण्याजोग्या खेळाडूंच्या प्रतिष्ठेला अकारण हानी पोहोचवली आणि शिस्तभंगाच्या चौकटीने स्थापित केलेल्या सुरक्षा उपायांना कमी लेखले, असे महासंघाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या निर्णयात म्हटले आहे.
नारोडित्स्की ऑक्टोबरमध्ये त्यांच्या नॉर्थ कॅरोलिनामधील घरी मृतावस्थेत आढळले. विषशास्त्र अहवालानुसार, प्रमाणापेक्षा जास्त औषध सेवनामुळे ह्दयाची धडधड वाढल्याने त्यांचा मृत्यू झाला.
नारोडित्स्की यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी सांगितले होते की, क्रॅमनिकच्या आरोपांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला होता. क्रॅमनिकच्या प्रकरणानंतर मला असे वाटते की, जर मी चांगली कामगिरी करू लागलो तर लोक माझ्याबद्दल वाईट हेतु असल्याचा अंदाज लावतात. मुद्दा फक्त त्याचा दीर्घकाळ टिकणारा परिणाम आहे, असे नारोडित्स्की यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या लाईव्हस्ट्रीममध्ये म्हटले होते. क्रॅमनिकने नारोडित्स्की यांच्या मृत्यूला एक शोकांतिका म्हटले आहे. त्याने सांगितले की, कोणताही तथ्यात्मक आधार नसताना त्यांना नारोडित्स्कीच्या मृत्यूशी जोडण्याची एक स्वार्थी मोहीम चालवली गेली होती.