चेन्नईची पराभवाची हॅट्ट्रिक
आरसीबीचा 43 धावांनी विजय : सलग दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी : सामनावीर टीम डेविडच्या 25 चेंडूत 70 धावा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सचा 43 धावांनी धुव्वा उडवला. टीम डेविड, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 250 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे यांसारखे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. ज्यामुळे संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईला 207 धावापर्यंत मजल मारता आली.
या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. दोन सामन्यांत दोन विजय आणि 4 गुणांसह उत्कृष्ट नेट रनरेटमुळे आरसीबीचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, एमएस धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची अवस्था खराब झाली असून, त्यांना स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तळाशी आहे.

टीम डेविडची वादळी फटकेबाजी, रजत पाटीदारचेही तांडव
प्रारंभी, चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या फलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई करत 251 धावांचा डोंगर उभा केला. सुरुवात थोडी सावध झाली असली तरी मधल्या आणि शेवटच्या षटकांत आरसीबीच्या फलंदाजांनी गिअर बदलत चेन्नईच्या गोलंदाजी धुलाई केली. विराट कोहलीने 18 चेंडूत 28 धावा केल्या. फिल सॉल्टने 30 चेंडूत 46 धावांची झंझावाती खेळी केली, तर देवदत्त पडिक्कलने 29 चेंडूत 50 धावा करत अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार होते. मात्र खरी वादळी खेळी शेवटच्या काही षटकांत पाहायला मिळाली. टिम डेविडने तर चेन्नईच्या गोलंदाजांची झोप उडवली. त्याने अवघ्या 25 चेंडूत नाबाद 70 धावांची तुफानी खेळी करत 3 चौकार आणि तब्बल 8 षटकार ठोकले. त्याला रजत पाटीदारची चांगली साथ मिळाली. त्याने 19 चेंडूत नाबाद 48 धावा करत 6 षटकार ठोकले. चेन्नईकडून शिवम दुबे, ओव्हर्टन आणि अंशुल कंबोजने प्रत्येकी 1 बळी घेतला. आरसीबीने शेवटच्या 5 षटकांत तब्बल 95 धावा झोडपल्या तर आरसीबीचा चेन्नईवरील हा सलग पाचवा विजय आहे.
चेन्नईचा सलग तिसरा पराभव
धावांचा पाठलाग करताना चेन्नईची टीम 19.4 षटकांत 207 धावांवर सर्वबाद झाली. संघासाठी सरफराज खानने सर्वाधिक 25 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावांची झंझावाती खेळी केली. याशिवाय, प्रशांत वीरने 43 तर जिमी ओव्हर्टनने 37 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने चेन्नईला 43 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर जेकब डफी, अभिनंदन सिंग आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तसेच सुयश शर्माने 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकांत 3 बाद 250 : फिल सॉल्ट 30 चेंडूत 46, कोहली 18 चेंडूत 28, पडिक्कल 29 चेंडूत 50, पाटीदार 19 चेंडूत नाबाद 48, टिम डेविड 25 चेंडूत नाबाद 70, अवांतर 8, अंशुल कंबोज, ओव्हरटन, शिवम दुबे प्र्रत्येकी 1 बळी.
चेन्नई सुपरकिंग्स 19.4 षटकांत सर्व बाद 207 : सर्फराज खान 25 चेंडूत 50, प्रशांत वीर 29 चेंडूत 43, ओव्हरटन 16 चेंडूत 37, कंबोज 12 चेंडूत नाबाद 19, दुबे 13 चेंडूत 18, अवांतर 7. भुवनेश्वर 3-41, डफी 2-58, अभिनंदन सिंग 2-30, कृणाल पंड्या 2-36, सुयश शर्मा 12d21.